◾बोईसरच्या शाही लग्न सोहळ्याकडे महसूल विभागाने केले होते दुर्लक्ष; शिवसेनेचे वैभव संखे यांच्या मुलाच्या लग्नात हजारोची गर्दी
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: पालघर जिल्हाधिकारी यांच्या पथकाने करोनाचे निर्बंध उल्लंघन करणाऱ्या लग्न सोहळ्यात धाड टाकून काही मोजक्या लोकांवर कारवाई केली होती. याच वेळी बोईसर मध्ये सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांने नियम धुडकावून आपल्या मुलाचा शाही विवाह सोहळा पार पाडला होता. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातुन लग्न समारंभ बाबत कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी पालघर यांना आदेश देण्यात आले आहेत. यामुळे बोईसर भागात आपले राजकीय दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्याला लग्न सोहळा चांगलाच अंगलट आला आहे.
बोईसर पुर्वेकडील खैरापाडा येथे असलेल्या इको इडन्टसिटी याठिकाणी शिवसेनेचे वैभव संखे यांच्या मुलाचा शाही थाटात लग्न समारंभ रविवारी आयोजित केला होता. विशेष म्हणजे याठिकाणी शिवसेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत उपस्थित असल्याने याठिकाणी कारवाई बाबत महसूल विभागाने पाठ फिरवली असल्याचे उघड झाले होते. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातुन लग्न सोहळा प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी पालघर यांना देण्यात आले आहेत. पालघर जिल्हाधिकारी यांनी करोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर संबंधित महसूल विभागाने व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विभागातील लग्नसोहळ्याची माहिती गोळा करून देणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
◾बोईसर येथे पारपडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्नात ड्रोन कँमेराने देखील चित्रीकरण करण्यात आले असून ड्रोन उडविण्यासाठी बोईसर पोलीस ठाण्यातून परवानगी घेण्यात आली होती का हा प्रश्न देखील समोर येत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना कायद्याचा बडगा दाखवून लग्न समारंभ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवणारे जिल्हाधिकारी आता बोईसर मधील शाही सोहळ्या कारवाई करणार का असा सवाल उपस्थित करत याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तातडीने कारवाई बाबत आदेश उपविभागीय अधिकारी पालघर यांना देण्यात आले असून नियम धुडकावून लग्न सोहळा करणाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.