पालघर दर्पण, प्रतिनिधी
मुंबई : गैरप्रकारात दोषी आढळलेल्या राज्यातील ३४७ रास्त भाव (रेशन) दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी विधानसभेत दिली.
कदम यांनी माहिती दिली की, मौ. अकोली जहागीर येथील रास्त भाव दुकानातून अवैध धान्यसाठा आढळून आल्यामुळे कारवाई करुन तो जप्त करण्यात आला आहे. संबंधित दुकानदाराचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या बाबत न्याय प्रविष्ट आहे. चौकशीनंतर कठोर कारवाई करण्यात येईल. गैरव्यवहार केल्याच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या दुकानांवर प्रथम परवाने निलंबित करण्याची आणि नंतर कायमचे रद्द करण्याची कारवाई केली जाते, अशी माहितीदेखील कदम यांनी यावेळी दिली.