■मनसुख हिरेन मृत्यू आणि मुकेश अंबानींच्या घरासमोर चारचाकीत स्फोटक पदार्थ आढळल्याचा प्रकरणाचा योग्यपणे तपास सुरू; गृहमंत्री अनिल देशमुख
पालघर दर्पण, प्रतिनिधी
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या चारचाकी वाहनाचे मालकाचा मृतदेह आढळल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
मुब्रा येथील रेतीबंदर खाडीमध्ये चारचाकी वाहनांचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने मृत्यूचे गूढ वाढले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार याप्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची मागणी करत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तपास एटीएसकडे सोपवत असल्याचे जाहीर केले.
मनसुख हिरेन संशयित मृत्यूप्रकरणी भा.दं. वि. कलम ३०२, २०१ आणि १२० बी नुसार अज्ञात व्यक्तिविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर स्फोटक पदार्थ असलेल्या चारचाकी वाहन सापडल्याच्या प्रकरणात महाराष्ट्र पोलीसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) तपास योग्यपणे सुरू आहे. तपासाअंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषद व विधान सभेत निवेदनाद्वारे दिली.