■शुक्रवारी १२ मार्च रोजी ४ देशांच्या प्रमुखांची एकत्र बैठक; पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती दर्शवणार.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
देशांच्या प्रमुखांची क्वाड संघटनेची बैठक शुक्रवारी १२ मार्च रोजी होणार असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. ही बैठक ऑनलाईन माध्यमातून होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या चार देशांमधील ही पहिली बैठक असुन चारही देशांचे पंतप्रधान (प्रमुख) या बैठकीला उपस्थिती दर्शविणार आहेत. या बैठकीत देशातील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे.
हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता कायम रहावी आणि युद्धजन्य परिस्थिती उद्भवू नये हे क्वाडचं लक्ष्य आहे. शुक्रवारी १२ मार्च ला होणाऱ्या बैठकीत चारहीे देशांचे प्रमुख आपल्या स्थानिक मुद्यांसोबतच काही जागतिक समस्यांवरही चर्चा करतील. करोना महामारीपासून जलवायु परिवर्तन यांसारख्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होईल. चारही देशांचे नेते प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर समान हितसंबंधांसह चर्चा करतील. हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात स्वतंत्र, अखंडित आणि सर्व जहाजांच्या वाहतुकीवर विचारांची देवाण-घेवाण करणार आहेत. चारही देश करोना सारख्या महामारीच्या संसर्गावर चर्चा करतील. तसेच हिंदी-प्रशांत महासागर क्षेत्रात लसीची सुरक्षा, एकसमान आणि परवडणारी लस यावर चर्चा करतील. करोनावरील चर्चेदरम्यान चीनचा मुद्दा उपस्थित होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांनी करोनाच्या संसर्गासाठी चीनला जबाबदार ठरवले होते. व चीनच्या चौकशीची मागणी केली होती. यामुळे यावेळी चीनविरोधात कोणती भूमिका घेतली जाईल याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे.