◾नागझरी सर्वेनंबर 150 मध्ये बेकायदा खोदकामाला लगाम लागणार कधी; आता पालघर जिल्हाधिकारी यांनीच लक्ष देण्याची गरज
◾हेमेंद्र पाटील
पालघर तालुक्यातील नागझरी, लालोंडे, निहे, गुंदले, किराट, चिल्हार अशा अनेक भागात बेकायदेशीर दगड खदानींचा सुळसुळाट सुरू आहे. कारवाई साठी वरिष्ठ अधिकारी माफियांना पाठबळ देत असल्याने आजवर ठोस कारवाई याठिकाणी झालेली नाही. कोणी कितीही तक्रारी करा मात्र बेकायदेशीर खदान सुरूच राहणार अशा मस्तीत येथील माफिया वावरत असतात. या माफियांचा थेट संबंध पालघर तहसीलदार कार्यालय व प्रांत कार्यालय असल्याने यांच्या बेकायदेशीर खदानींवर कोणत्याही प्रकारची कारवाई कधीही होत नाही. स्थानिक तलाठ्यांने एखाद्या बाबत अहवाल सादर जरी केला तरी येथील माफिया वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वजन टाकुन शांत करतात हेच आता म्हणावे लागेल. कारण तक्रार होऊन देखील गेल्या पाच वर्षात एकाही खदानीवर ठोस कारवाई झालेली नाही.
खदान माफिया म्हटलं की नागझरी भाग डोळ्यासमोर येतो मात्र याठिकाणी डोळे उघडे ठेवून गेले तर धुळीकणामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. खदानी बरोबरच बेकायदेशीर उभारण्यात आलेल्या क्रशर प्रकल्पाने देखील याठिकाणी धुडगूस घातला आहे. असो याठिकाणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना फिरण्यासाठी विशेष चश्मा येथील माफियांनी दिला आहे. त्या चश्म्यातुन सर्व काही निसर्गरम्य अशा भागात आलो की काय असा भास होतो. नागझरी येथे शेतकऱ्यांना वाटप झालेल्या सर्वेनंबर 150 या जागेवर माफियांनी बेकायदेशीर खदानींचे खोदकाम सुरूच ठेवले आहे. शेतकऱ्यांनी तक्रारी देखील केल्या एक दोन दिवस पालघराच्या तलसीदार यांनी काम बंद देखील केले. मात्र काही दिवसांनी पुन्हा याठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू झाले. माफियांचे थेट तलाठ्यांच्या वरती असलेल्या अधिकाऱ्यांन सोबत घनिष्ठ संबंध असल्याने तलाठी देखील हतबल झालेले दिसतात. किंबहुना त्यांनी देखील बेकायदेशीर खोदकामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष साहेबांच्या आदेशाने केले असेल अस आपण गृहीत धरले तर काही गैर होणार नाही.
नागझरी म्हटलं की याठिकाणी खदानी हे चित्र दिसत महसूल अधिकारी देखील याठिकाणी महिन्यातून एक दिवस फेरफटका मारतात. जसा शासकीय पगार महिन्याला दिला जातो तसा याठिकाणी देखील महिना झाल्यावर अधिकारी खिशा भरून घेतो. महसूल विभागा बरोबरच इतर विभाग देखील याठिकाणी महिन्यातून एकदा ग्रस्त घालतात. अगदी एखादे प्राणी दगावल्यावर गिधाडे आकाशात फिरतात तरीच परंतु ही गिधाडे रस्त्यावर फिरून आपले पोट भरणारी आहेत. वनविभाग तर नाहरकत दाखला देण्यासाठी अगदी सज्ज असतो. कायद्यानुसार वनजमीनी लगत खदानी खोदकाम करणे बंदी आहे. यातच वनखात्याच्या जागेवर खोदकाम झाले तर कारवाई केली जाते. मात्र नागझरी भागात अनेक खदानी वनखात्याच्या जागेवर आहेत. यातच काही माफियांनी तर वनखात्यांचे हद्द देखील पार केली आहे. तरी देखील बोईसरचा वनविभागाने वनखात्याच्या बाजूला असलेल्या सीमेवर खोदकाम केलेल्या खदानींना नाहरकत दाखले दिले आहेत. यामुळे याठिकाणी असलेले डोंगर टेकड्या रोजच नष्ट होताना दिसतात.
बेकायदेशीर खदानींना जिलेटीन देखील चोरट्या मार्गांने पुरवले जाते. तक्रार झाल्यावर कारवाई करणारा स्थानिक गुन्हे विभाग व इतर स्थानिक पोलीस गेल्या दोन वर्षात एकाही ठिकाणी कारवाई करू शकला नाही. दोन वर्षांपूर्वी तक्रार झाल्यानंतर धाड टाकून कारवाई करण्यात आली होती. बहुदा जिलेटीन स्फोट पोलिसांना ऐकू जात नसावेत. असो पालघरची यंत्रणा माखलेली असल्याने कारवाई बाबत अपेक्षा ठेवता येत नाही. वर पासून खाल पर्यंत खदानींच्या धुळी मुळे माखलेल्या यंत्रणेला पालघरच्या जिल्हाधिकारी यांनी सुर्यानदीत स्वच्छ करून दगडावर सुकत ठेवणेच आता गरजेचे आहे. यामुळे आता पालघर जिल्हाधिकारी यांनीच नागझरी भागाचा फेरफटका मारून आपल्या दिव्या खालील अंधारात कायकाय हैदोस अधिकाऱ्यांनी माजवला आहे हे पाहावे अशीच अपेक्षा जिल्हा वासीयांची आहे.