◾अत्यावश्यक रस्ता पुर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे; नागझरी-वेेळगाव भागात रखडलेल्या रस्त्यामुळे अपघातांना निमंत्रण
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्राला जोडणारा मुख्य रस्ता प्रशासनाच्या उदासिनते मुळे व राजकीय नेत्यांच्या खोड्यामुळे खोळंबला आहे. परिणामी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून जिल्हा प्रशासनाने देखील याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. जमीन मालकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडून मोबदला मिळाला असला तरी राजकीय पुढारी अनेक कारणे पुढे करून नेहमीच काम बंद पाडत असल्याच्या घटना घडतात. यातच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ देखील अशा दबावाला बळी पडून हताश होऊन आता जिल्हाधिकारी यांच्या कडे काम पुर्ण होण्यासाठी सहकार्य मिळाले यासाठी लेखी कळविले आहे.
आपत्कालीन स्थिती बोईसर-चिल्हार रस्ता अतिशय महत्त्वाचा असून तारापुर येथे असलेली औद्योगिक वसाहत व तारापुर अणुऊर्जा प्रकल्पा कडे जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. बोईसर-चिल्हार रस्त्यावर वाढलेली वाहतूक व होणारे अपघात यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्याचे काम 25 आँगस्ट 2015 पासून हाती घेतले होते. परंतु गेल्या सहा वर्षांपासून स्थानिकांच्या विरोधामुळे हे काम पुर्ण होऊ शकले नाही. मुळात याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ देखील जमीन मालकांचा विरोध डावलून काम करण्यासाठी अपयशी काही प्रमाणात ठरले आहे. मुळात जागेचे भुसंपादन झाले असताना देखील राजकीय मंडळी आपल्या सोईसुविधांसाठी वेळोवेळी कामात अडथळे आणत असले तरी याबाबत कोणत्याही प्रकारची फौजदारी कारवाई आजवर झालेली नाही. यामुळे काम थांबवून आपले वजन वाढवून घेणाऱ्या लोकांची याभागात चलती वाढत चाललेली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बोईसर-चिल्हार रस्त्यावरचे रूंदीकरण करण्यासाठी भुसंपादन 1976 ते 1981 च्या दरम्यान भूसंपादन केले आहे. मात्र यावेळी जमीन मालकांचे सातबारे उतारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावाने वर्ग करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली नसल्याने हे कारण पुढे करून काम वेळोवेळी अडवले जाते. यातच जागेचा संपूर्ण मोबदला त्याच वेळी देण्यात आला असला तरी वाढीव मोबदला मिळावा अशी मागणी देखील केली जात आहे. बोईसर चिल्हार रस्ता पुर्ण होण्यासाठी वेळगाव, नागझरी व चरी येथील काम होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र याठिकाणी कामाला अडवणूक होत असल्याने याच भागात मोठ्या प्रमाणात अपघात आजवर झाले आहेत. बोईसर चिल्हार रस्ता 16.50 किलोमीटर लांबीचा असुन यातील 13.50 किलोमीटर रस्त्यांचे चौपदरीकरण पुर्ण झाले असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पालघर जिल्हाधिकारी यांना दिली असून 3 किलोमीटरचे काम पुर्ण होण्यासाठी सहकार्य मिळवण्यासाठी लेखी विनंती केली आहे. यामुळे अत्यावश्यक असलेल्या रस्त्यावर जिल्हाधिकारी नेमके कधी लक्ष देवून कामे मार्गी लावतील याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.
◾ ठेकेदारांने केली तडजोड
बोईसर चिल्लार रस्त्यावर वाढीव मोबदला मिळावा यासाठी संघर्ष समिती स्थापन करून सुरूवातीला जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यानंतर त्यावर तोडगा काढून ठेकेदारांने स्वतः कडील प्रति गुंठ्या जागे प्रमाणे तिन हजार इतका मोबदला दिला जेणेकरून हाती घेतलेले काम पुर्ण करता येईल. यामध्ये समिती सोबत संलग्न असलेल्या लोकांनी अधिक रक्कम गैरमार्गाने आपल्या पदरात पाडून घेतली. याबाबत पुरावे देखील समोर आले असून जमीन मालकांना तडजोड म्हणून रक्कम दिल्याचे ठेकेदारांने देखील पालघर दर्पण सोबत बोलताना मान्य केले आहे.