◾ सरावली संजय नगर येथील सरकारी जागेवर होणार 50 खाटांचे बोईसर ग्रामीण रुग्णालय
◾सरावली संजयनगर येथील भुमाफियांच्या ताब्यात जाणाऱ्या जागेवर रुग्णालय उभारावे याबाबत पालघर दर्पणने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून केला होता पाठपुरावा
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: गेल्या अनेक वर्षांपासून लालफितीत अडकलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. सरावली संजय नगर येथील सरकारी जागेवर रुग्णालय उभारणीसाठी पालघर जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली असून याठिकाणी बोईसरचे ग्रामीण रुग्णालय उभे राहणार आहे. येथील सरकारी जागेवर भुमाफियांनी कब्जा करण्यासाठी प्रयत्न केले होते याबाबत अनेकदा पालघर दर्पणने वृत्त प्रसिद्ध करून याठिकाणी रुग्णालय उभारावे यासाठी पाठपुरावा केला होता.
बोईसर ग्रामीण रुग्णालयाची भाड्याने असलेली इमारत मोडकळीस आल्याने ग्रामीण रुग्णालयाचा कारभार तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात चालवला जात आहे. सुरूवातीला बोईसर ग्रामीण रुग्णालयासाठी चित्रालय येथे असलेल्या सरकारी जागेवर काम सुरू करण्यात आले होते. मात्र बीएआरसी ने या जागेवर दावा केल्यानंतर हे प्रकरण न्यालयात गेले होते. तेव्हा पासून बोईसरचे ग्रामीण रुग्णालय हे रखडले होते. याच दरम्यान महसूल विभाग देखील बोईसर भागात इतरत्र जागेचा मागोवा घेत होते. मात्र त्यांना संजय नगर येथील सरकारी जागा दिसून आली नव्हती. याठिकाणी एका राजकीय भुमाफियांने मंदिर बांधून ही जागा बळकविण्याचा प्रयत्न केला होता. काही भागात पत्र्याचे चाळ बांधकाम सुरू असताना तक्रार केल्यानंतर बोईसर महसूल विभागाने कारवाई केली होती. वर्षभरापासून याठिकाणी बोईसरचे ग्रामीण रूग्णालय उभारावे यासाठी पालघर दर्पणने अनेकदा वृत्त प्रसिद्ध करून त्यांचा पाठपुरावा केला होता. भुमाफियांच्या घशात जाणाऱ्या जागेवरच बोईसरचे ग्रामीण रुग्णालय उभारता येवु शकते याबाबत ठामपणे मत पालघर दर्पणने मांडले होते. यानंतर बोईसर महसूल विभागाने संजय नगर येथील सरकारी जागेवर ग्रामीण रुग्णालय बाबत अहवाल पालघर तहसीलदार यांच्या कडे पाठवला होता.
पालघर जिल्हाधिकारी यांनी देखील काही दिवसांपूर्वी या जागेची प्रत्येक्षात पाहणी केली होती. सरावली येथील सर्व्हे नंबर 104/1 अ मधील मोकळ्या सरकारी वर काही प्रमाणात अतिक्रमणे असून यातील 60 गुंठे जागा ग्रामीण रुग्णालयाला जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. याबाबत 19 मार्च रोजी आदेश काढण्यात आले असून ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागेवर 50 खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारले जाणार असून बोईसर वासीयांना त्याचा मोठा उपयोग होणार आहे.
◾ हजारो कामगारांना होणार रुग्णालयाचा उपयोग
बोईसर परिसरात असलेल्या तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे हजारो कामगार बोईसर भागात राहतात. यापूर्वी देखील बोईसर ग्रामीण रुग्णालयात दिवसाला 300 ते 400 सरासरी बाह्य रुग्ण तपासणी यासाठी याठिकाणी येत होते. अपूर्ण असलेली भाडेकरू जागा यामुळे रुग्णांना व आरोग्य अधिकाऱ्यांना देखील समस्यांचा सामना करावा लागत होता. याता 50 खाटांचे नवे रूग्णालय उभे राहणार असल्याने कामगार वर्गाला याचा मोठा उपयोग होणार आहे. यातच बोईसर सभोवताली असलेल्या आदिवासी पाड्यातील लोकांना देखील बोईसर ग्रामीण रुग्णालयाचा मोठा आधार होणार आहे.