■लस सुरक्षित, सर्वांनी लसीकरण करून घ्यावे; जिल्हाधिकारी यांचे आव्हाहन.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
पालघर : कोविड१९ या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरण करण्यात आले. यात जिल्ह्यातील ९१ हजार ५६१ जणांना कोविड लस देण्यात आली. यादरम्यान लस सुरक्षित आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे जिल्हाधिकारी यांनी आव्हाहन केले.
पालघर ग्रामीण तसेच वसई- विरार महानगरपालीका क्षेत्रामधील आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीमध्ये काम करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक व्याधी असलेल्या व्यक्तीसह ७५ हजार ७२८ जणांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला असुन १५ हजार ८३३ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे. असे एकुण जिल्ह्यामध्ये ९१ हजार ५६१ व्यक्तींना कोविड-१९ लसीकरण करण्यात आले आहे. हे लसीकरण पुर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले.
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लस जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. लसीकरण केंद्राची संख्या ६१ असुन त्यामध्ये पालघर ग्रामीण येथे ३२ शासकीय लसीकरण केंद्र तर ५ खाजगी लसीकरण केंद्र आहेत तसेच वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये १४ शासकीय तर १० खाजगी लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिली.
१ मार्च ते २८ मार्च दरम्यान जिल्ह्यामध्ये ३६७७ नविन कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची नोंद झाली असून या कालावधीमध्ये १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.