■सागरी व्यापार क्षेत्रात रोजगार व पर्यटनाच्या असंख्य संधी; राज्यपाल कोश्यारी
पालघर दर्पण, प्रतिनिधी
मुंबई : प्राचीन काळापासून भारताला सागरी व्यापाराचा गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. देशाचा ९० टक्क्यांहून अधिक व्यापार जलवाहतुकीच्या माध्यमातून होतो. गेल्या काही वर्षांमध्ये केंद्र शासनाने सागरी व्यापाराला विशेष महत्व दिले असून विविध ठिकाणी जलमार्ग विकसित करण्यात येत आहेत. या क्षेत्रात रोजगार व पर्यटनाच्या असंख्य संधी निर्माण होत असून या क्षेत्राचा अपेक्षित विकास झाल्यास आगामी काळात सागरी व्यापार क्षेत्रात देशाला उज्ज्वल भवितव्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
अठ्ठावनाव्या राष्ट्रीय सागरी दिन आयोजन समितीतर्फे आयोजित राज्यस्तरीय मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत बुधवारी राजभवन येथे झाले. यावेळी नौवहन (शिपिंग) महासंचालक अमिताभ कुमार यांनी राज्यपालांच्या जॅकेटला मर्चंट नेव्हीच्या ध्वजाची छोटी प्रतिकृती लावली.
सागरी व्यापार क्षेत्रात आमुलाग्र प्रगती साधण्यासाठी सरकारने मेरिटाईम इंडिया व्हिजन २०३० धोरण तयार केले असून त्यातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कार्य सुरु आहे. राज्याने देखील सागरी पर्यटनाला चालना देण्याचे दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. भारतीय नौवाहक (सी फेअरर्स) जगातील अनेक देशांच्या जहाजांवर उल्लेखनीय कामगिरी करीत असून त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले गेले पाहिजे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
कोरोना संसर्गाच्या काळात देखील सागरी व्यापार क्षेत्राने आपले कार्य अविरत सुरु ठेवले व एकही व्यापारी जहाज या काळात नांगर टाकून थांबले नाही अशी माहिती नौवहन महासंचालक अमिताभ कुमार यांनी दिली. सागरी व्यापाराचे क्षेत्र अधिक वेगाने प्रगती करीत असून शिपिंग विभागाने कोरोना काळात ई गव्हर्नन्सचा अधिकाधिक अंगीकार केला तसेच शिक्षण, प्रशिक्षण व परिषदा डिजिटल माध्यमातून सुरू ठेवल्या अशी माहिती त्यांनी दिली.