पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापुर औद्योगिक क्षेत्रातील एन झोनमधील एका कारखान्याला शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना समोर आली. कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाला अडीच तास लागले असुन आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नं एन-१२८ बजाज हेल्थ केअर कारखान्याला शनिवारी सकाळी ८:३० च्या दरम्यान आग लागली. कामगारांनी आग लागल्याचे पाहताच सावधगिरीने आगीपासून लांब पळाल्याने सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. घटनास्थळी आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे ३ बंब पाचारण करण्यात आले होते.
◾बजाज हेल्थ केअर या ग्रुपचे एन झोनमध्ये २१६, २१७,१२८, व २२१ असे ४ कारखाने असुन गेल्या काही वर्षात यातील कारखान्यांमध्ये सातत्याने अपघात झाले आहेत. प्रदूषणात देखील या कारखान्यांचा मोठा वाटा असून सुरक्षतेचे नियम धाब्यावर बसवून चालवल्या जाणाऱ्या कारखान्यांवर प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करत आहे. दोन वर्षांपूर्वी विषारी वायू गळतीमुळे ३० ते ४० कामगारांना ईजा झाली होती. तसेच दीड महिन्यांपूर्वी शनिवारी १३ फेब्रुवारी रोजी बजाज हेल्थ केअर प्लॉट नं एन-२१६ या कारखान्याला आग लागली होती यामध्ये निलेश बोरसे या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.