◾पालघर जिल्ह्यातील वेवजी, गीरगाव, गिमाणीया, संभा, आच्छाड ग्रामपंचायती गुजरात राज्याच्या सीमेत
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गुजरात राज्यातील सोलसुंभा ग्रामपंचायतीने घुसखोरी करुन पथदिवे उभारल्याने सीमेचा वाद मिटलेला नसताना गुगल मॅपमध्ये महाराष्ट्रातील वेवजी, गीरगाव, गिमाणीया, संभा, आच्छाड ग्रामपंचायती गुजरात राज्याच्या सीमेत दर्शवण्यात आल्याचे समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर वेवजी, गिरगाव,गिमाणीया, झाई, संभा, अच्छाड या ग्रामपंचायतीच्या हद्दीवरील महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा निश्चित करण्याची मागणी होऊ लागली आहे. गुजरात राज्यातील ग्रामपंचायतींचे अतिक्रमणाचा विषय वादाचा विषय बनला आहे. वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्वे नं २०४ चा भुखंड आणि सोलसुंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सर्वे नंबर. १७३ हे दोन भुखंडावर दोन राज्यांची सिमा आहे. गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या या सीमेवरील हद्द निश्चित नसल्याने वेवजीमध्ये गुजरात राज्याच्या ईमारती उभ्या राहात आहेत. यातच आता वेवजी मधील इंडीया काॅलनी, दुकाने तसेच एमबीबीआय शाळा गुगल मँपमध्ये गुजरात राज्यात दिसत असल्याने सीमा भागातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील वेवजी ग्रामपंचायतीच्या हद्दीत गुजरात राज्यातील सोलसुंभा ग्रामपंचायतीने विजेचे पोल उभारुन महाराष्ट्राच्या हद्दीत अतिक्रमण केले आहे. वेवजी ग्रामपंचायतीने गुजरात राज्यातील सोलसुंभा ग्रामपंचायतीला वीजेचे पोल काढून नेण्यास कळवले असतानाही सोलसुंभा ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्यातील वीजेचे पोल काढत नसल्याने सीमेचा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. गुजरात आणि महाराष्ट्र दोन राज्यांच्या सिमा सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक ग्रामपंचायत, भुमी अभिलेख आणि महसूल खात्याने अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आला आहे.