◾जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर देखील बोईसर चिल्हार रस्त्याकडे पाहण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांना सवड नाही
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्राला जोडणारा रस्त्यांचे भिजते घोंगडे कायमच असून प्रशासनाच्या उदासिनतेमुळे नागरीकांचे जीव जात आहेत. अपुर्ण रस्त्याच्या कामामुळे हा रस्ता धोकादायक बनला असून या रस्त्यांचे पोलीस बंदोबस्त देवुन तातडीने काम करून घ्यावे असे पत्र पालघर जिल्हाधिकारी यांनी प्रांत अधिकारी पालघर यांना दिले आहे. मात्र महिना उलटत असला तरी पालघरच्या प्रांत अधिकारी यांना अत्यावश्यक असलेल्या कामाकडे लक्ष देण्यासाठी सवड नसल्याचे दिसून आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्राबरोबरच अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणाऱ्या एकमेव महत्त्वाच्या रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने हाती घेतले आहे. मात्र गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या कामात स्थानिक राजकीय मंडळींनी जमीन मालकांना हाताशी घेवून केलेली आडकाठी यामुळे रस्त्यांचे काम पुर्ण होऊ शकले नाही. परिणामी याठिकाणी शेकडो अपघात गेल्या पाच वर्षात झाले असून अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. या अत्यावश्यक असलेल्या रस्त्यांचे नागझरी व वेळगाव भागातील काम पुर्ण होण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पालघरचे जिल्हाधिकारी यांना साकडे घालून काम पुर्ण होण्यासाठी मदतीची अपेक्षा केली. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. मणिक गुरसळ यांनी महत्त्वाचा विषय असल्याने त्याची तातडीने दखल घेवून पालघरचे प्रांत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना 18 मार्च 2021 रोजी पत्र देवून काम पुर्ण करून घेण्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरवावा व काम पुर्ण करून घ्यावे असे आदेश दिले. परंतु जवळपास महिना उलटत असला तरी पालघरच्या प्रांत अधिकारी यांनी याकडे ढुंकूनही पाहिले नाही.
बोईसर चिल्हार रस्त्यांचे भुसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने 1976 ते 1981 च्या दरम्यान भूसंपादन करून जमीन मालकांना मोबदला देखील देण्यात आला होता. मात्र यावेळी जमीन मालकांचे सातबारे उतारे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावाने वर्ग करण्याची प्रक्रिया पुर्ण झाली नसल्याने हे कारण पुढे करून राजकीय मंडळी वेळोवेळी स्थानिकांना पुढे करून काम बंद पाडत आहेत. बोईसर चिल्हार रस्ता 16.50 किलोमीटर लांबीचा असुन यातील 13.50 किलोमीटर रस्त्यांचे चौपदरीकरण पुर्ण झाले आहे. रस्ता पुर्ण होण्यासाठी वेळगाव, नागझरी व चरी येथील एकुण 3 किलोमीटर लांबीचे चौपदरीकरण बाकी असून पावसाळ्या अगोदर काम पुर्ण करणे आवश्यक आहे. याभागात अपुर्ण राहिलेल्या कामामुळे अचानक रस्ता अरुंद होत असल्याने अपघात नेहमीच होतात. पालघर जिल्हाधिकारी यांनी अत्यावश्यक असलेल्या रस्त्याचे काम पुर्ण होण्यासाठी तत्परता दाखवली असली तरी संधी शोधून काम करणारे अधिकारी पालघर तालुक्यात असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशावर देखील डोळेझाक केली जात असल्याचे स्पष्ट होते.
◾ पालघर जिल्हाधिकारी यांनी प्रांत अधिकारी पालघर यांना रस्त्याचे काम पुर्ण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त पुरवणे व इतर बाबींसाठी दिलेले पत्र याबाबत प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर यांना संपर्क साधला असता त्यांनी याबाबत सातबारे उतारे होण्याचे काम बाकी आहे तसेच जमीन मालकांनी हरकत घेतली याबाबत आमदार राजेश पाटील यांच्या सोबत देखील बैठक झाल्याचे उत्तर देत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या पत्राबाबत उत्तर दिलेले नाही.