पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: डहाणूचे माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांचे सोमवार 12 एप्रिल रोजी पहाटे 4.30 वाजता निधन झाले. ते 45 वर्षाचे होते. करोना संसर्गामुळे मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास सोडला. तलासरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.
प्रकृतीच्या तक्रारीवरुन दहा दिवसांपूर्वी धनारे यांच्यावर गुजरातमधील वापी येथील रेम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र रविवारी रात्री त्यांची तब्येत बिघडली यानंतर त्यांना मुंबईत हलवण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांची आज (सोमवार) सकाळी प्राणज्योत मालवली. पास्कल धनारे हे 2014 मध्ये डहाणू मतदारसंघातून भाजपमधून आमदार म्हणून निवडून आले. आमदार व पालघर जिल्हाध्यक्ष ही दोन्ही पदे भुषवली.अत्यंत कठीण परिस्थितीत तलासरी सारख्या भागात भारतीय जनता पार्टीचे काम वाढवुन पार्टी पालघर जिल्ह्यात उभा करणारा नेता हरपला. त्यांच्या जाण्याने पार्टीचे व जिल्ह्याचे न भरून निघणारे असे नुकसान झाल्याची पदाधिकार्यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली.