पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल असून या जंगलात मोहाची झाडे सध्या मोहफुलाने बहरला आहे. ही फुले पहाटेपासून झाडाखाली गळून पडलेली फुले घरातील लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सारेच मोहफुले गोळा करण्याच्या कामात पहाटेपासूनच दुपारपर्यंत व्यस्त झाली आहेत. मोहाच्या फुलामुळे नवीन रोजगारांची निर्मिती झाली आहे.
मार्च – एप्रिल मध्ये मोहाच्या झाडांना मोठया प्रमाणात फुले येतात. ही फुले पहाटेपासून गळण्यास सुरवात होते. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत या फुलांची वेचणी केली जाते. नंतर ही फुले सुकवली जाऊन नंतर एकत्र करून त्यांना बाजारात विक्रीसाठी नेली जातात. या फुलांना विक्रमगड बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून 25 ते 30 रुपये किलो भाव दिला जातो. तर काही व्यापारी बाजारात ही फुले घेऊन त्याच्या बदल्यात कांदा,बटाटा ,लसूण असे गृहपयोगी वस्तू देत असतात. सध्या कोरोनाचे संकट डोक्यावर घोंगावत असल्याने शाळा – कॉलेजना सुद्धा सुट्ट्या दिल्या आहेत. शहरातील मुले ऑनलाइन शिक्षणात गुंग आहेत मात्र विक्रमगड तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमधील मुले ही सकाळी- सकाळी मोहफुले वेचण्यात गुंग असतात. या मोहफुले वेचून ते सुकवून नंतर ती बाजारात विकून आलेल्या पैशातून शैक्षणिक साहित्य घेण्यास या मोहफुलांचा त्यांना हातभार लागतो. तसेच आईवडिलांच्या संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न ते ही मोहफुले वेचून करत असतात.
पहाटेपासून ही लहान लहान फुले वाचण्याची मेहनत केली जाते. आयुर्वेदिक असलेल्या या फुलांना व्यापारी मात्र कवडीमोल किमतीत विकत घेत असल्यामुळे मेहनतीएवढा फायदा काही मिळत नसतो. त्यामुळे अनेक गावांना यापासून गावठी दारू बनवली जाते. मोहाच्या फुले सुकवून त्यापासून दारू बनविण्यात येते. मात्र त्यास सरकारची परवानगी नाही. मात्र विक्रमगड तालुक्यासह पालघर जिल्ह्यात मोहाच्या फुलांपासून वायनरी बनविण्याच्या उद्योगाला परवानगी दिल्यास येथील आदिवासी समाजाच्या हाताला कामधंदा मिळून त्यापासून त्यांना रोजगार मिळेल. तसेच मोहाच्या झाडांचे संगोपन होऊन जंगले शाबूत राहतील.शासनाने जर मोहाच्या झाडाच्य उपयुक्ततेच्या संशोधकांना चालना दिली तर या संपूर्ण भागातील आदिवासींचे जीवन उंचावू शकते.
◾उपयुक्त असे मोहाचे झाड
मोहाचे झाड हे ग्रामीण भागांसाठी कल्पवृक्ष ठरत आहे. या झाडाच्या फुलांपासून ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होतो. तर यांच्या येणाऱ्या फळांची भाजी केली जाते. ती पूर्णपणे सेंद्रिय असून ती फळे आयुर्वेदिक देखील आहेत आहे. तर या फळांपासून मिळणाऱ्या बियांपासून तेल काढले जाते. याचा वापर भाजी बनविण्यासाठी केला जातो. तसेच हे तेल देखील विविध विकारांसाठी वापर जाते. त्याच बरोबर हे झाड उन्हाळ्यात गर्द सावली देत असल्याने वाटसरू देखील भर उन्हापासून वाचण्यासाठी या झाडाच्या सावलीचा वापर करतात. त्यामुळे बहुपयोगी अशा या मोहाच्या झाडांचे शासनाने संवर्धन करायला हवे.तसेच वृक्षारोपणासाठी परदेशी झाडांयेवजी या मोहाच्या झाडांची लागवड करण्यास वनविभागास तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहित करायला हवे.