◾ रेल्वेच्या माध्यमातून प्राणवायूची वाहतूक
पालघर दर्पण, प्रतिनिधी
बोईसर: महाराष्ट्रात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान माजवले असुन आरोग्य यंत्रणेपुढे आता प्राणवायू टंचाईचे मोठे आव्हाहन उभे ठाकले आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरात प्राणवायूचा तुटवडा भासत असल्याने तुटवडा दूर करण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेस द्वारे उपचारासाठी आवश्यक असणाऱ्या प्राणवायूची वाहतूक केली जाणार आहे.
करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असुन मृत्यू संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश रूग्णालयात प्राणवायूचा साठा कमी झालेला असुन उपचारासाठी प्राणवायूची मागणी मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. ही गैरसोय थांबवण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून प्राणवायूची वाहतूक केली जाणार आहे. रेल्वे रुळांवर ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार असुन रविवारी बोईसर येथे ट्रायल घेण्यात आली. टँकर मध्ये प्राणवायू भरण्यासाठी विजाग, अंगुल आणि भिलाईत रॅम्प केले जातील. देशात यासाठी ३ रॅम्प तयार करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारने रेल्वे मंत्रालयाला रेल्वेद्वारे द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) रेल्वेद्वारे नेता येईल का अशी विचारणा केली होती. रेल्वेने याची तांत्रिक व्यवहार्यता तपासुन ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ एप्रिल (आज) विशाखापट्टणम च्या दिशेने पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस धावली असुन ही एक्सप्रेस १० टँकर भरून प्राणवायू घेऊन महाराष्ट्रात परतेल. ऑक्सिजन एक्सप्रेसची वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना व्हावी यासाठी ग्रीन कोरिडोर तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस माध्यमातून प्राणवायूच्या रिकाम्या टँकरला कळंबोली-बोईसर येथून मुंबई येथे पाठवली जाणार असून पुढे ही एक्सप्रेस विशाखापट्टणम, जमशेदपूर, रुरकेला, व बोकरो येथे पाठवली जाणार आहे. तिथे या रिकाम्या टँकरमध्ये द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) भरण्यात येईल.
■ *रोल ऑन रोल ऑफ सेवेद्वारे प्राणवायूची वाहतूक केली जाणार.*
रस्त्यांवरच्या अनेक ठिकाणी रोड ओव्हरब्रिज असल्याने टँकर्स जाणे शक्य नव्हते. त्यामुळे ३३२० एमएम उंचीचे असलेले टी१६१८ या रोड टँकर मॉडेल १२९० मिमी उंची असलेल्या समतल वँगनवर ठेवले जाणार असल्याची माहिती आहे. हे टँकर कळंबोली स्थानकात हलविले जाणार असुन देशातील तीन रॅम्प पैकी एक रॅम्प कळंबोली येथे तयार होणार आहे.