■ योग्यवेळी उपचार झाल्याने प्रकृती स्थिर; मात्र आजारपणाने त्रस्त असलेल्याने मदतीची गरज.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
पालघर : वसई येथील रहिवासी असलेल्या एका ३३ वर्षीय गृहस्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात फिनायल पिऊन स्वतःचे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. योग्यवेळी उपचार झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असुन आजाराने त्रस्त असल्याने तसेच रोजगार नसल्याने उपासमारीची वेळ आल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला.
सोमनाथ चौधरी असे या गृहस्ताचे नाव असुन ४ वर्षांपूर्वी सोमनाथ व त्यांची पत्नी मुंबईतील एका रुग्णालयात चतुर्थश्रेणी कामगार म्हणून काम करत होते. मात्र या दोघांनाही दुर्धर आजार झाला असल्याचे रुग्णालयात समजल्या नंतर त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. यानंतर कोणतेही काम नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत गेली. गेल्या वर्षभरापूर्वी दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या सोमनाथ यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. तसचे यांना ६ वर्षाचा मुलगा असुन तो देखील मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहे. सोमनाथ यांना दुर्धर आजार असल्याने मुलाजवळ रहात येत नाही. त्यामुळे मुलगा विश्वनाथ याला कल्याण येथील एका अनाथ आश्रमात ठेवण्यात आले आहे.
आजारपणामुळे कोणीही काम देत नसल्याने त्यांची परिस्थिती हालाकीची आहे. अनेक जणांकडे मदतीचा हात पसरून त्यातील काहींनी मदत केली देखील मात्र लोक तरी किती दिवस मदत करणार असे सोमनाथ यांनी सांगितले. मदतीसाठी जिल्हाअधिकारी यांच्याकडे अपील केलं परंतु भेट न झाल्याने त्यांनी फिनायल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. फिनायल पिले हे लक्षात येताच उपजिल्हाधिकारी यांनी रुग्णवाहिका बोलावली असुन लगेचच चौधरी यांना ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले योग्य वेळी उपचार झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.
■ जिल्हाधिकारी व वसई विरार महानगरपालिलेला मदतीचा केला होता अर्ज मात्र दखल नाही..
मदत मिळावी म्हणून जिल्हाधिकारी व वसई विरार महानगरपालिकेला अर्ज केला होता. मात्र त्यावेळी अर्जाची कोणी दखल न घेतल्यामुळे पुन्हा मदतीसाठी जिल्हाअधिकारी यांच्याकडे अपील केल.
■ चौधरी यांनी केली मदतीची मागणी.
सद्यस्थितीला माझ्या घरचे भाडे त्याचे डिपॉझिट,खाण्यालायक अन्न व औषधासाठी काही पैसे अशी मदत मला मिळवून द्या अशा विनवण्या सोमनाथ चौधरी करीत होते.