◾ विरार मधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एसीचा स्फोट होऊन झाली दुर्घटना
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: विरार मध्ये कोविड रुग्णालयात अतिदक्षता विभागात आगीत होरपळून १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पहाटे एसीचा स्फोट होऊन लागलेल्या आग लागली होती. याठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांना अग्निशमन दलाच्या जवानांनी व पोलिसांनी इतरत्र रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवसापूर्वी नाशिक येथे आँक्सिजन गळतीमुळे २४ रुग्णांना आपले जीव गमवावे लागले होते. यामुळे रुग्णालयातील सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास एसी स्फोट झाल्याने आग लागली होती. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग अग्निशमन दलाने वेळीच आटोक्यात आणली होती. अतिदक्षता विभागात रुग्ण उपचार घेत असलेल्या १७ करोनाबाधित रुग्णांन पैकी १३ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याठिकाणी असलेल्या इतर पाच रुग्णांना सुखरूप इतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये पाच महिला व आठ पुरूषांचा समावेश असून उमा सुरेश कनगुटकर, निलेश भोईर, पुखराज, वल्लभदास वैष्णव, रजनी आर कडू, नरेंद्र शंकर शिंदे, जनार्दन मोरेश्वर म्हात्रे, कुमार किशोर दोशी, रमेश टी उपयान, प्रविण शिवलाल गोडा, अमेय राजेश राऊत, रामा अण्णा म्हात्रे, सुवर्णा एस पितळे सुप्रिया देशमुख अशी मृतांची नावे आहेत.