◾ रुग्णालयात व सीटी स्कॅन सेंटर मध्ये जाणाऱ्या रुग्णांना करावा लागतो दुरचा प्रवास
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: दिवसेंदिवस करोना रुग्ण वाढत असल्याने बोईसर मध्ये प्रशासन रस्ता बंद करून सक्रिय झालेले दिसून आले आहे. शहरात मुख्य असलेला व त्यातल्यात्यात कोविड रुग्णालय व सीटी स्कॅन सेंटर कडे जाणारा चित्रालय बोईसर मुख्य रस्ता बोईसर पोलिसांनी बंद केला आहे. परिणामी तिन ते चार किलोमीटर चा वळसा मारून रुग्णांना रुग्णालयात जावे लागत असून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बोईसर शहरात येणारा एमआयडीसी नाका चित्रालय ते बोईसर रेल्वे स्टेशन रस्ता अतिशय महत्त्वाचा असून याच रस्त्यावर काही अंतरावर रुग्णालये देखील आहेत. यातच सिडको रूपरजत येथे असलेले सीटी स्कॅन सेंटर याठिकाणी डहाणू पासून करोना रुग्ण एचआरसीटी करण्यासाठी सीटी स्कॅन सेंटर मध्ये येतात. मात्र दोन दिवसापासून चित्रालय एमआयडीसी नाका येथे संपूर्ण रस्ता बंद केल्यामुळे याचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. गंभीर रुग्णांना उपचारासाठी वेळेवर रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित असते मात्र बोईसर मध्ये पोलिसांनी मुख्य रस्ते पुर्ण बंद केल्याने रुग्णांन बरोबर अत्यावश्यक सेवेत असलेल्यांना वेठीस धरले जात आहे.
बोईसर चित्रालय मुख्य रस्ता एकिकडे बंद केला असताना दुसरी कडे तारापूर औद्योगिक क्षेत्रात टाकी नाका याठिकाणी देखील रस्ता खोदकाम करण्यात आल्याने रुग्णालयात जायचे कसे हा प्रश्न समोर येतो. साधारण तिन ते चार किलोमीटर चा वळसा मारून कँम्लीन नाका येथून बोईसर कडे जावे लागते. यातच नवीन येणाऱ्या नागरिकांना त्यातल्या त्यात रुग्णांलयात तपासणी साठी येणाऱ्यांना बंद रस्त्यामुळे दुसरा रस्ता शोधताना दमछाक होते. महामंडळाच्या बसला देखील लांबचा पल्ला मारून जावे लागत आहे. अचानक बंद केलेल्या रस्त्यामुळे अनेकांना माहिती नसल्याने बंद असलेल्या रस्त्या पर्यंत येवून लोकांना माघारी परतावे लागते. पोलिसांनी रस्ता बंद करताना त्याठिकाणी काही जागा अत्यावश्यक सेवा साठी व रुग्णवाहिका जाण्यासाठी जागा ठेवणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे.