◾ बोईसरमध्ये उपचारासाठी रुग्णांची फरफट; दिवसभर फिरून देखील एकाही ठिकाणी उपचार मिळाले नसल्याने रिक्षांतच मृत्यू
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: रोजच करोना रुग्णांची संख्या बोईसर भागात वाढत असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार देखील मिळत नाही. परिणामी उपचारा अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याची दुर्दैवी घटना बोईसर मध्ये घडली आहे. एका इसमाला दिवसभर फिरून देखील एकाही रुग्णालयात उपचार मिळाले नसल्याने अखेर त्यांने रिक्षांतच आपले प्राण सोडले. यावरून बोईसर मध्ये ढासळलेली आरोग्य व्यवस्था दिसून आली आहे.
बोईसर दांडीपाडा भागात असलेल्या इकोडंट सिटी येथे राहणारे सिरंग गावडे वय 55 वर्षे यांची शनिवारी 24 एफ्रिल रोजी सकाळी तब्येत बिघडली होती. श्वास घेण्यासाठी होणारा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी त्यांची पत्नी व मुलगा रिक्षात घेवून निघाला. बोईसर येथील वरद हाँस्पिटल, शिंदे हाँस्पिटल, चिन्मय हाँस्पिटल, तुंगा हाँस्पिटल अशा अनेक ठिकाणी जावून देखील उपचार करण्यासाठी नकार देण्यात आला. रुग्णाला दाखल करण्यासाठी जागा नाही असे कारण देण्यात आले. त्यानंतर घाबरलेल्या कुटुंबातील लोकांनी त्यांना बोईसर बेटेगाव येथील अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात आणले. मात्र त्याठिकाणी देखील जागा उपलब्ध नसल्याने रिक्षांतच ठेवलेल्या सिरंग गावडे यांचा त्याच ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सिरंग गावडे यांची करोना तपासणी मृत्यू अगोदरच करण्यात आली असून एक तातडीने केलेली चाचणी निगेटिव्ह असून दुसरी केलेल्या चाचणीचा अहवाल दोन दिवसांनी मिळणार असल्याचे त्यांच्या कुटूंबियांनी सांगितले.
बोईसर येथे रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या रिक्षात गावडे यांचा मृतदेह तसाच पडून होता. कोणतीही शासकीय यंत्रणा त्याठिकाणी नव्हती पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे होता. साधारणपणे दुपारी 3 वाजता मृत्यू झाल्यानंतर मृतदेह रात्री आठ पर्यंत त्याच ठिकाणी बाहेर उघड्यावर पडून होता. पतीचा असा उपचारा अभावी मृत्यू झाल्याने त्यांची पत्नी देखील त्यांच्या बाजूला बसुन राहिली होती. पतीचा हात रिक्षाच्या सिट खाली पडल्यावर हात वेवस्थीत ठेवत आजूनही आपला माणूस जीवंत आहे अशा आशेने पाहत असलेल्या त्या महिलेचे दुख: पाहवता येत नव्हते. घटनास्थळी पालघर दर्पणचे संपादक गेले असताना त्यांनी पालघर तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंडागळे यांना दूरध्वनीवरून उपचारा अभावी झालेला मृत्यू व रिक्षांतच पडून राहिलेला मृतदेह याबाबत माहिती दिली. मात्र आरोग्य अधिकाऱ्यांनी देखील मृतदेहावर नातेवाईकांना अंतिम संस्कार करायला सांगा एवढेच उत्तर दिले. करोना मध्ये हा मृतदेह योग्य प्रकारे बंदोबस्त करणे गरजेचे असताना देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
◾ बोईसर मध्ये शासनाने मान्यता दिलेल्या कोविड रुग्णालयात सुविधांची कमतरता असल्याचे समोर आले आहे. चिन्मय हाँस्पिटल, वरद हाँस्पिटल व अधिकारी लाईफ लाईन अशा रूग्णालयांना कोविड रूग्णालय म्हणून मान्यता मिळाली आहे. यातच अधिकारी लाईफ लाईन हाँस्पिटल मध्ये जिल्हा प्रशासना कडून देण्यात आलेले तिन वेंटीलेटर बंद असून रुग्णालयाने कळवून सुध्दा दुरूस्ती बाबत कोणताही माणूस आरोग्य विभागाने पाठवलेला नसल्याने याठिकाणी अतिदक्षता विभागात उपचार देणे शक्य होत नाही. एखाद्या रुग्णांची प्रकृती खालावली तर उपचार कसे द्यायचे हा प्रश्न डाँक्टरांन पुढे उभा राहिला आहे.