◾ औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांनी सोडलेल्या विषारी वायूमुळे नागरिकांना त्रास; कोलवडे गावातील लोकांना श्वास घेण्यासाठी होऊ लागला प्रचंड त्रास
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून बेकायदेशीर पणे मोठ्या प्रमाणात विषारी वायू सोडल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावात या वायूचा प्रंचड त्रास नागरिकांना होऊ लागला असून नागरिकांनी अनेकांना फोन करून देखील कोणताही अधिकाऱ्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. यातच काहींना चक्कर येण्याच्या घटना देखील घडल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांनी वायू प्रदूषण पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरू केल्याचे दिसून आले आहे. टाळेबंदी असल्याचा फायदा घेत प्रदूषणकारी उद्योजक बेकायदेशीर पणे विषारी वायू हवेत सोडत असल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री 10 च्या सुमारास औद्योगिक क्षेत्रा लगत असलेल्या कोलवडे गावात मोठ्या प्रमाणात विषारी वायू मिश्रित धुर संपूर्ण गावात पसरला. काही वेळात नागरिकांना डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे व चक्कर येण्याच्या घटना घडू लागल्याची माहिती कोलवडे येथील सामाजिक कार्यकर्ते मनिष संखे यांनी दिली. यातच हवे पेक्षा जड असलेला हा वायु मिश्रित धुरामुळे श्वास घेण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे नागरिकांन कडून सांगण्यात आले. गावकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व अधिकाऱ्यांचे दुरध्वनी बंद आढळून आले. एकही अधिकारी याठिकाणी रात्रीच्या वेळी उपलब्ध नसल्याने प्रदूषणकारी कारखान्यांचे फावत चालले आहे.
मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण झाल्याने घाबरलेल्या नागरीकांनी रस्त्यावर येत बोईसर पोलिसांना संपर्क केल्यानंतर कोलवडे गावात पोलीस दाखल झाले. मात्र कोणता कारखाना वायु सोडतो याची बित्तंबातमी असलेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी याठिकाणी उपलब्ध नसल्याने प्रदूषणकारी कारखान्यांचा शोध घेता येत नाही. दिवसेंदिवस तारापूर धोकादायक बनत चालले असताना प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येते. परिणामी मोठ्या गंभीर अपघाताला नागरीकांनाच सामोरे जावे लागणार यात काही शंका नाही. यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी जोरधरू लागली आहे.