■एप्रिल मध्ये होणाऱ्या परीक्षा आता जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
पालघर दर्पण, प्रतिनिधी
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एमबीबीएसची १९ एप्रिल मध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या परीक्षा जून महिन्यात होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. या परीक्षा जून च्या पहिल्या आठवड्यात होणार आल्याचे देखील देशमुख यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेणे अशी आमची भूमिका नाही. असे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले होते. एप्रिल मधील होणाऱ्या एमबीबीएसच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी विद्यार्थी करत होते. एकूण ५० हजार विद्यार्थी परीक्षा देणार असुन ४५० विद्यार्थ्यांना व काही पालकांना करोनाची लागण झाली आहे. ही संख्या विचारात घेऊन एमबीबीएस च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्याशी चर्चा करण्यात आली.
एमबीबीएसच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे जाहीर करण्यात येईल असे अमित देशमुख यांनी सांगितले व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्रावर येणंजाणं किंवा अन्य ठिकाणी जाण्यात बऱ्याच अडचणी येत होत्या. शिवाय अनेक विद्यार्थ्यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व पाहता परीक्षा पुढे ढकलणं शक्य असल्याने आम्ही हा निर्णय घेतला.असं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.