■ अजुन १५ दिवस लॉकडाऊन वाढणार; आरोग्यमंत्री टोपे यांनी अंदाज केला व्यक्त.
पालघर दर्पण, प्रतिनिधी
१४ एप्रिल पासून ते १ मे पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र आता लॉकडाऊन आणखीन वाढण्याची शक्यता दर्शवली जात आहे. राज्यात लॉकडाऊन आणखीन वाढणार असुन नेमका किती दिवसांवर लॉकडाऊन लांबणीवर जाणार याचा निर्णय घेणे बाकी आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील लॉकडाऊन वाढणार असल्याचे स्पष्ठ केले. त्यांनी सांगितले की, सध्या लॉकडाऊन वाढवण्यासारखीच परिस्थिती राज्यात आहे. सध्या ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लागू आहे. राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असुन शेवटच्या दिवशी नेमके किती दिवसांचे लॉकडाऊन करायचे यावर निर्णय घेतला जाईल. त्याच बरोबर १५ दिवस लॉकडाऊनमध्ये वाढ होईल असा अंदाज टोपे यांनी व्यक्त केला आहे.
आता मुंबई ठाण्यातील रुग्णांची टक्केवारी घटली आहे. पण विदर्भ आणि मराठवाडा अनेक जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत घट दिसत नाही. म्हणून लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यावर विचार करण्यात येत आहे. राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होते आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यामुळे १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं.