◾ आरोग्य विभागाने विविध ठिकाणी सुरू केलेल्या कोविड तपासणी केंद्राचे राजकारण्यांन कडून श्रेय घेण्याचा प्रयत्न
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: पालघर तालुक्यात आरोग्य विभागाने विविध भागात सुरू केलेल्या कोविड तपासणी केंद्राचे राजकीय पक्षांनी राजकारण सुरू केले आहे. शासनाकडून सुरू करण्यात आलेली तपासणी केंद्र आपणच सुरू केल्याचे सांगत समाज माध्यमावर आपणच समाजसेवक असल्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. असाच प्रकार बोईसर मध्ये घडला असून बोईसर रेल्वे स्टेशन याठिकाणी घेण्यात आलेला कोविड तपासणी शिबीर आरोग्य विभागाने आयोजित केले असताना देखील स्थानिक राजकीय मंडळींनी त्यांचे फोटो समाजमाध्यमांवर टाकत आपण कार्यक्रम घेतल्याचे श्रेय घेतले जात असल्याचे दिसून आले आहे.
बोईसर भागात लाखोंची लोकसंख्या असून याठिकाणी दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. करोना चाचणी टिमा रुग्णालयात होत असल्याने त्याठिकाणी देखील रोजच गर्दी वाढत चालली आहे. यामुळे आरोग्य विभागाने बोईसर मधील काही भागात कोविड तपासणी साठी रँपिड अँटिजेन कोविड चाचणी शिबीर बुधवार 28 एप्रिल रोजी आयोजित केले होते. याठिकाणी संपूर्ण शिबिर हे आरोग्य विभागाकडून राबविण्यात आले असताना देखील बोईसर मधील भाजपाच्या पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम आपणच घेत असल्याचा दाखवत तसा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केला होता. तसेच याबाबत चे छायाचित्र देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. 29 एप्रिल रोजी कुरगाव ग्रामपंचायत याठिकाणी देखील कोविड तपासणी शिबीर घेण्यात आल्याचे संदेश सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले होते. एकिकडे आरोग्य विभागाचे डॉक्टर व कर्मचारी दिवसरात्र करोना रुग्णांच्या उपचारासाठी काम करत असताना दुसरीकडे राजकीय मंडळी मात्र आपणच सर्व काही करतो असता केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
करोना काळात राजकीय मंडळींनी कोणत्याही प्रकारे बनावट श्रेय न घेता प्रशासनाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र बोईसर भागात कामापेक्षा फोटो जास्त अशी परिस्थिती राजकीय मंडळींची झाली आहे. यातच आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जावून त्याठिकाणी श्रेय घेण्याचे प्रकार बोईसर मधील भाजपाच्या पदाधिकारी यांच्या कडून सुरू आहेत. यातच काही गरजूंना या राजकीय मंडळी कडून उपचारासाठी मदत देखील झाली असे ते स्वागतार्ह देखील आहे. बोईसर भागातील धनानी नगर येथे देखील शुक्रवारी 30 एफ्रिल रोजी एका लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने कोविड तपासणी केली जाणार असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर टाकण्यात आला होता. राजकीय मंडळी शासकीय शिबिरांचा लाभ आपल्या मतदारसंघात आपली छाप पाडण्यासाठी करत असल्याचे दिसून येत आहे. करोना काळात एकदोन काम केल्याचे दाखवून त्याचे वृत्त प्रसिद्ध करून आणणारे समाजसेवक बोईसर मध्ये सक्रिय झाले आहेत.
◾बोईसर व इतर सर्व ठिकाणी घेण्यात आलेली कोविड तपासणी शिबीर हे शासकीय होते. मात्र चुकिची माहिती पसरविण्यात आल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाने घेण्यात आलेल्या कोविड तपासणी शिबीर याबाबतपरिपत्रक काढले जाईल. आम्ही सद्या खुप तणावाखाली काम करत असून होत असलेल्या राजकारणामध्ये लक्ष घालून उर्जा वाया घालवू शकत नाही. होत असलेल्या राजकारणामुळे विविध भागात घेण्यात येणाऱ्या तपासण्या बंद करून आरोग्य केंद्रात घेतल्या जातील. कोविड तपासणी वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रित येवून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
डॉ. अभिजीत खंदारे, तालुका आरोग्य अधिकारी पालघर