◾ कमला लाईफ साईन्सेस लिमिटेड कारखान्याने उत्पादन वाढविण्याची केली तयारी; पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली कारखान्याला भेट
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: देशातील सर्वात जास्त रेमडिसिविर उत्पादन करणाऱ्या तारापूर मधील कारखान्यातुन लाखो इंजेक्शन देशासह महाराष्ट्र राज्यात पुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात रेमडिसिविर चा तुटवडा भासणार नाही असा विश्वास कारखान्यांच्या मालकांनी दाखला असल्याने ही सर्वांन साठी आनंदाची बातमी आहे. राज्या बरोबर पालघर जिल्ह्याला देखील तातडीने रेमडिसिविर मिळावे यासाठी पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कमला लाईफ साईन्सेस या कारखान्याला भेट दिली. यावेळी कारखाना चेअरमन यांनी देखील पालघर जिल्ह्यासाठी काही दिवसातच प्रशासनाकडे काही प्रमाणात रेमडेसिविर सुपुर्द करणार असल्याचे सांगितले.
करोना रुग्णांना उपचारासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा राज्यात असल्याने अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकार जरी रेमडेसिविर मिळविण्यासाठी धडपड करत असली तरी कच्चा माल वेळेवर उपलब्ध झाला नसल्याने रेमडेसिविरचा तुटवडा भासत होता. मात्र देशात सर्वात जास्त रेमडेसिविर उत्पादन घेणाऱ्या तारापूर मधील कमला लाईफ साईन्सेस लिमिटेड या कारखान्यात अधिक उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न केले जात असून येत्या 10 मे पर्यंत राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा भासणार नाही असा विश्वास कारखान्यांचे चेअरमन डॉ. दिगंबर झवर यांनी सांगितले. पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांनी कमला लाईफ साईन्सेस कारखान्याला 1 मे रोजी भेट देवून पालघर जिल्ह्यासाठी अतिरिक्त रेमडेसिविर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी सविस्तर झालेल्या चर्चेनंतर डॉ. दिगंबर झवर यांनी पालघर जिल्हा प्रशासनाला रेमडेसिविर नियमाप्रमाणे परवानगी घेऊन उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. यामुळे पालघर बरोबर महाराष्ट्रात देखील येत्या काही दिवसात रेमडिसीवीर चा तुटवडा भासणार नसल्याने आरोग्य विभागाला रुग्णांवर योग्य उपचार करता येणार आहेत. यावेळी पालकमंत्री यांच्या सोबत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, शहर प्रमुख मुकेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, बोईसर ग्रामपंचायत सदस्य निलम संखे आदी उपस्थित होते.
◾ 50 लाख रेमडेसिविर बनविण्याची क्षमता
तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या कमला लाईफ साईन्सेस लिमिटेड कारखान्यात आजच्या घडीला दिवसाला 20 हजार लिक्विड रेमडिसिविर बनवले जातात. या कारखान्यांची वाढविण्यात आलेल्या क्षमते नुसार महिन्याला 50 लाख रेमडेसिविर बनविण्याची क्षमता आहे.
◾तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये कमला लाईफ साईन्सेस लिमिटेड या कंपनीमध्ये रेमडेसिवीर या इंजेक्शनची निर्मिती केली जाते. आणि आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे ती या कंपनीतुन देशाला त्याचा पुरवठा केला जातो. या कंपनीला आम्ही सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट दिलेली आहे. आणि डॉ. झवर साहेबांना आम्ही विनंती पण केलेली आहे की, आपल्या या पालघर जिल्ह्याच्या करोना रुग्णांसाठी थोडा सहानुभूती पूर्वक विचार करावा. आणि तशी कायदेशीर मागणी आम्ही कंपनीकडे केलेली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.
— दादा भुसे, पालकमंत्री पालघर
◾मी आणि माझा सारख्या जितक्या कंपन्या भारतामध्ये आहेत त्यांनी सगळ्यांनी आपली क्षमता वाढवली आहे. आणि त्याचा परिणाम आता लवकरच दिसायला मिळेल साधारण मला असा अंदाज आहे की १० मे ते १५ मे पर्यंत रेमडेसिवीरच प्रमाण भरपूर वाढलेलं असेल. आणि सगळीकडे त्याच वितरण उत्तम प्रकारे होईल. आणि मला असा विश्वास वाटतो की रेमडेसिवीर उपलब्ध नाही म्हणून त्याला ब्लॅक मार्केटिंग करून घ्यावे लागतेय किंवा त्यांच्यामुळे त्याचा जीव गेला अस होणार नाही. तसेच तातडीने रेमडेसिविर उत्पादन घेण्यासाठी इतर औषधांचे उत्पादन थांबवले आहे.
— डॉ. दिगंबर झवर, चेअरमन , कमला लाईफ साईन्सेस लिमिटेड