पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: मनोर ग्रामपंचायत हद्दीतील सुश्रुषा हॉस्पिटलसमोरच्या अरीहंत काॕम्पलेक्स लगतच्या कचरा कुंडीत मंगळवारी 4 एप्रिल उघड्यावर वापरून टाकलेला प्लास्टिकचा पीपीई किट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मनोर पोलीस ठाण्यालगतच्या नुकताच कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी वापरलेल्या पीपीई किटचे शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असताना,अज्ञात इसमाने ग्रामपंचायतीच्या कचरा कुंडीत पीपीई किट उघड्यावर टाकल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान कचरा कुंडीत टाकलेला पीपीई किट मनोरच्या कोविड सेंटर मधील असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. कोविड सेंटर मधील कचरा उघड्यावर टाकल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
■ अरीहंत कॉम्प्लेक्स लगतच्या कचरा कुंडीत अज्ञात इसमाकडून पीपीई किट टाकण्यात आला होता.ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि सुश्रुषा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसोबत कचरा कुंडीतील पीपीई किट जप्त करण्यात आला असून पीपीई किटची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
— नितीन पवार,
ग्रामविकास अधिकारी,मनोर
■ आमच्या हॉस्पिटलमध्ये प्लास्टिकचे पीपीई किट वापरले जात नाहीत.कचरा कुंडीतील आढळेल पीपीई किट अज्ञात इसमाने टाकला असल्याची शक्यता आहे.याबाबत मनोर ग्रामपंचायतीला माहिती देण्यात आली आहे.
— डॉ आदित्य सातवी
व्यवस्थापक,सुश्रुषा कोविड सेंटर