◾बोईसर टिमा हाँल येथील कोविड लसीकरण केंद्रात गोंधळ; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अंतर नियमांचे उल्लंघन
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: कोविड लसीचा साठा संपल्याने अनेक दिवसापासून बंद असलेले लसीकरण केंद्र गुरुवारी सुरू होणार याठिकाणी शेकडो नागरिकांनी बोईसर टिमा हाँल येथे गर्दी केली आहे. पहाटे पासुन याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक लसीकरण होणार म्हणून जमा झाले असून याठिकाणी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. यातच अंतर नियमांचे देखील उल्लंघन करण्यात आले असून नियोजन शुन्य कारभार याठिकाणी चालवला जात असल्याने एकच गोंधळ उडाला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या टिमा हाँल येथे कोविड लसीकरण पुन्हा सुरू करण्यात आले असून याठिकाणी गुरुवारी 500 नागरिकांचे लसीकरण करणार असल्याचे आरोग्य विभागाने अगोदरच्या दिवशी जाहीर केले. त्यानंतर गुरूवारी 6 मे रोजी पहाटे 3 वाजता पासूनच याठिकाणी नागरिकांनी याठिकाणी येण्यासाठी सुरुवात केली. सकाळी ज्या नागरीकांचा दुसरा लसीकरण आहे त्यांना बोलवण्यात आले होते. तसेच ज्यांचे पहिलेच लसीकरण आहे अशांना दुपारनंतर लसीकरण करण्याचे आरोग्य विभागाने जाहीर करून देखील नागरीकांनी एकच गर्दी याठिकाणी केली. महत्त्वाचे म्हणजे इतर कार्यक्रमाला 25 पेक्षा जास्त गर्दी झाल्यावर कारवाई करणारे प्रशासन एकाच वेळी शेकडो लोकांना गोळा का करते हा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. नागरिकांनी गोंधळ केल्याने आरोग्य विभागाने बोईसर पोलिसांना बंदोबस्त देण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने लसीकरण केंद्रावर सकाळी पासून गोंधळ सुरूच आहे.
◾ बोईसर टिमा हाँल येथे आज 500 लोकांना लसीकरण केले जाणार असून टोकन देवून लसीकरण केले जात आहे. नागरिकांनी याठिकाणी गर्दी करून गोंधळ केल्याने याबाबत बोईसर पोलिसांना सांगितले होते. मात्र याठिकाणी पुरेश्या प्रमाणात बंदोबस्त देण्यात आलेला नाही. सर्व लोक आरोग्य विभागाला धारेवर धरते परंतु आमचे काम लसीकरण करण्याचे आहे. गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवायला हवे. रेमडेसिविर कारखान्यांच्या बाहेर 10 पोलीस उभे केले असतात मग याठिकाणी बंदोबस्त का नाही.
— डॉ. अभिजीत खंदारे, तालुका आरोग्य अधिकारी पालघर