◾रेमडेसिविर उत्पादन वाढीबाबत चेअरमन दिगंबर झवर यांच्या सोबत केली चर्चा
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील देशासाठी महत्त्वाच्या असलेल्या कमला लाईफ साईन्सेस
कारखान्याला मुंबई च्या पालकमंत्री यांनी भेट दिली. गुरूवारी दुपारी भेटी दरम्यान त्यांनी कारखान्यांची पाहणी देखील केली. सद्यस्थितीत तारापूर मध्ये मंत्र्यांचे दौरे वाढत असून राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष तारापूर मधील रेमडेसिविर बनविणाऱ्या कारखान्याकडे लागलेले दिसून येते.
करोना रुग्णांना उपचारासाठी लागणारे रेमडेसिविर या इंजेक्शना तुटवडा भासत असल्याने नागरिकांना काळाबाजारातुन दामदुप्पट रक्कमेने विकत घ्यावी लागत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. यातच याबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी तारापुरच्या दौऱ्यावर असताना याबाबत भाष्य केले. गुरूवारी 6 मे रोजी मुंबईचे पालकमंत्री यांनी तारापूर मधील कमला लाईफ साईन्सेस या रेमडेसिविर बनविणाऱ्या कारखान्याला भेट दिली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी बोलताना सांगितले की, देशामध्ये रेमडेसिविरसाठी पळापळ चालू असून लोकांना रेमडेसिवीर मिळत नाही. रेमडेसिविर चा काळाबाजार सुरू असून दोन हजार रूपयाचे इंजेक्शन 20 ते 50 हजार रूपयाला लोकांना घ्यावे लागते असे त्यांनी सांगितले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याची काय झळ बसत असेल याचा अंदाज येतो.
तारापूर मधील कमला लाईफ साईन्सेस या कारखान्यात आजच्या तारखेला 30 लाख रेमडेसिविर बनविण्याची क्षमता. असून कारखान्याला कच्चामाल वेळेवर उपलब्ध झाला तर 50 लाख रेमडेसिविरचे उत्पादन घेतले जावू शकते, रेमडेसिविर सहज उपलब्ध झाल्यावर काळाबाजाराला लगाम बसेल असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. कारखान्यांचे चेअरमन दिगंबर झवर यांच्या सोबत रेमडेसिविर उत्पादन वाढी बाबत पालकमंत्री यांच्या सोबत कारखान्यात बैठक पार पडली. यावेळी कारखान्यांचे राज झवर, बोईसर मधील समाजसेवक माजी पंचायत समिती सदस्य मुकेश पाटील उपस्थित होते.