◾ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा कारनामा; गतिरोधक उभारायला बोईसर पोलिसांनी दिले नियमबाह्य पत्र
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या बोईसर-चिल्हार रस्त्यावर बेकायदेशीर गतिरोधक टाकण्याचा प्रताप महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने केला आहे. बोईसर चिल्हार रस्ता हा राज्य मार्ग असून हा रस्ता चौपदरीकरणाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करत आहे. मुख्य रस्त्यावर गतिरोधक टाकू नये असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील या मुख्य रस्त्यावर बेटेगाव पोलीस चौकी येथे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. यातच या गतिरोधकामुळे सर्वसामान्य वाहन चालकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे.
बोईसर चिल्हार रस्त्यावर बेटेगाव पोलिस चौकी जवळ तिन गतिरोधक टाकल्याने वाहने याठिकाणी आढळून जातात. या मुख्य रस्त्यावर दिवसभर हजारो वाहने ये-जा करत असून याठिकाणी वाहनांची वळदळ असते. या रस्त्यावर दुचाकीस्वार, खाजगी वाहने व त्याच बरोबर औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या मालवाहू वाहनांना देखील या गतिरोधकाचा त्रास सहन करावा लागत आहे. करोना काळात बोईसर येथून मुंबईत रुग्णांना उपचारासाठी घेवून जाण्यासाठी हा एकच महत्त्वाचा रस्ता असून बेटेगाव जवळ गतिरोधक टाकल्याने वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिका देखील याठिकाणी अचानक समोर येणाऱ्या गतिरोधकावर आढळतात. यामुळे बेकायदेशीर टाकलेले गतिरोधक काढण्याची मागणी केली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुख्य रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा अडथळा गतिरोधक नसावा असा कायदा आहे. मात्र बोईसर पोलिसांनी याठिकाणी गतिरोधक टाकण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लेखी पत्र दिल्याचे समोर आले आहे. पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल सुरळकर यांच्या म्हणण्यानुसार बोईसर भागात चोरीचे प्रमाण वाढले आहे. चौकीवर असलेल्या सिसीटिव्ही मध्ये वाहनांचे संपूर्ण नंबर यावे यासाठी याठिकाणी गतिरोधक टाकायला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सांगितले होते असे त्यांनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे बोईसर पोलिसांनी आपल्या पदाचा वापर करून दिलेल्या पत्रामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने देखील बेकायदेशीर गतिरोधक उभारल्याने सर्वसामान्य वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
◾ बेकायदेशीर पणे सोडली दुभाजक मध्ये मोकळी जागा
बोईसर चिल्हार रस्त्यावर ज्याठिकाणी गाव पाडे व वसाहतीचे मुख्य रस्ते याठिकाणी दुभाजक वाहने व नागरिकांना जाण्यासाठी मोकळे असणे बंधनकारक आहेत. मात्र या मुख्य रस्त्यावर ठिकाणी प्रत्येक 50 ते 100 मिटर अंतरावर बेकायदेशीर पणे उद्योजक, अनधिकृत बांधकामे व अनधिकृत धाब्यांन साठी दुभाजक मध्ये मोकळीक सोडली आहे. यामुळे अचानक रस्ता ओलांडून वाहने दुसऱ्या बाजूला ये-जा करत असल्याने अपघाताची स्थिती निर्माण होत आहे. याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हे ठेकेदाराने सोडले असल्याचे सांगण्यात आले. यामुळे येथील अधिकारी ठेकेदाराच्या सांगण्यावरून काम करत असल्याचे दिसून येते.
◾बोईसरच्या पोलीस निरीक्षक यांनी लेखी पत्र दिले पोलिसांन कडून याठिकाणी गतिरोधक टाकावा यासाठी सतत सांगितले जात होते. यामुळे त्याठिकाणी गतिरोधक टाकण्यात आला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे याठिकाणी गतिरोधक टाकण्याचे म्हणणं नव्हते. गतिरोधक नियमानुसार टाकता येत नाही याबाबत पोलिसांना लेखी सांगितले जाईल व गतिरोधक काढला जाईल.
— संदीप बडगे, उप अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तारापूर