◾वरई पारगाव रस्त्यावरील केयर कोविड सेंटर मधील प्रकार; कोविड सेंटरचा नियमानुसार बिल आकारणी केल्याचा दावा
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: वरई पारगाव रस्त्यावरील केयर खाजगी कोविड सेंटर कडून कोरोना बाधित रुग्णाच्या दीड दिवसाच्या उपचारासाठी 35 हजार रुपये आकारण्यात आले आहेत.त्यामुळे खाजगी कोविड सेंटर मध्ये उपचार घेणे सर्वसाधारण कुटुंबातील कोरोना बाधित रूग्णांच्या आवाक्याबाहेरची बाब ठरू लागली आहे. सर्वसामान्य परिस्थितीतील रूग्णांसाठी पालघर तालुक्यात शासकीय कोविड रुग्णालये सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
कोरोना बधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने शासकीय कोविड सेंटर मध्ये बेड मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून खाजगी रुग्णालयांना कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. तालुक्यात अनेक खाजगी कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत.
सफाळे परिसरातील 54 वर्षीय कोरोना बाधित रुग्ण बुधवारी वरई पारगाव रस्त्यावरील गिराळे गावातील केयर कोविड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. दुसऱ्या दिवशी या रूग्णाला पालघरच्या ढवळे रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्याने त्याने केयर कोविड सेंटर मधून डिस्चार्ज घेतला होता.बुधवार पासून गुरुवार पर्यंतच्या दीड दिवसांचे बिलापोटी रूग्णाला 35 हजार रुपये आकारण्यात आले होते. तडजोड करून पाच हजार रुपयांची सवलत मिळवून रुग्णाने तीस हजार रुपये बिल भरून कोविड सेंटर मधून डिस्चार्ज घेतला. परंतु त्यानंतर या रुग्णाने खाजगी कोविड सेंटर कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी अव्वाच्या सव्वा बिलाची रक्कम आकारत असून रूग्णांची लूट सुरू असल्याचे सांगत बिलाची प्रत समाज माध्यमातून व्हायरल केली होती. त्यामुळे सर्वसामान्य परिस्थितीतील कोरोना बाधित रुग्णांना खाजगी कोविड सेंटर मध्ये उपचार घेणे आवाक्याबाहेरची बाब असल्याचे समोर आले आहे.बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी शासकीय कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे.
■ याप्रकरणी केयर कोविड सेंटरचे व्यवस्थापक डॉ जितेंद्र शीतनामे यांनी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार बिलाची रक्कम आकारण्यात आली असल्याचे सांगितले.