◾बिल कमी करण्यावरून तुंगा रुग्णालयात झाला वाद; बोईसर भाजपाचे प्रशांत संखे यांच्यावर गुन्हा दाखल
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: कोविड रुग्णांचे उपचाराचे बिल सर्वसामान्य नागरीकांच्या आवाक्याबाहेर असून बोईसर मध्ये रुग्णांची लुट सुरू आहे. बोईसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचाराचे बिल कमी करण्याच्या वादातून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांने मर्यादा ओलांडून व्यवस्थापकांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला आहे. या पदाधिकाऱ्यांने मारहाण केल्याचा आरोप रुग्णालय व्यवस्थापका कडून करण्यात आला असून याबाबत बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करोना रुग्णांना उपचार देणे प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्यानंतर खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णालय म्हणून घोषित केले असले तरी याठिकाणी लाखोची बिले घेतली जातात. प्रशासनाचे देखील यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने उपचारानंतर होणाऱ्या खर्चावरून वाद उफाळून येत आहेत. असाच प्रकार बोईसर मध्ये घडला असून बोईसरच्या तुंगा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोना रुग्णाला रविवारी घरी सोडण्यात आले. यावेळी प्रमाणापेक्षा अधिक बिल आल्याने रुग्णांने बिल कमी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर भाजपाचे बोईसर येथील प्रशांत संखे यांनी याठिकाणी जाऊन बिल कमी घेण्याची विनंती केली होती. मात्र यावेळी झालेल्या वादातून प्रशांत संखे यांनी तुंगा रूग्णालयाच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लावून दिल्याचा व संगणक आपटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
तुंगा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी यांनी अशा घटनेचा निषेध करत काम बंद करण्याचा पवित्रा घेतला होता. सध्या या रुग्णालयात ३३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून यातील ५ रुग्ण अतिदक्षता विभागात तर १२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुळात रुग्णालयात जावून कोणावरही हात उचलणे अत्यंत चुकीचे असल्याने या घटनेचा निषेध केला जात आहे. मात्र कोविड रुग्णालयात घेतल्या जाणाऱ्या बेसुमार बिला बाबत जिल्हा प्रशासनाचे यावर नियंत्रण का नाही असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान प्रशांत संखे व त्यांच्या साथीदारांवर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
◾डजनभर नेते पोलिस ठाण्यात उपस्थित
भाजपाचे प्रशांत संखे यांना पोलिसांनी ताब्यात घेवून बोईसर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यानंतर बोईसर मधील भाजप व इतर पक्षांच्या नेत्यांनी झाडून हजेरी लावली होती. प्रशांत संखे यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी हालचालींना वेग आला होता. संचारबंदी असताना देखील पोलीस ठाण्यात 15 ते 20 राजकीय पक्षांची लोक उपस्थित होती. मात्र बोईसरची सुरक्षा राखण्यासाठी तत्परता दाखविणाऱ्या पोलिस निरिक्षकांनी नियमांचे उल्लंघन होत असताना त्याकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते.