◾ नागझरी भागातील नियमबाह्य सुरू असलेल्या क्रशर मशीन मुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात
◾ महसूल व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आशिर्वादाने नियमबाह्य क्रशर सुरू
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: पालघर तालुक्यातील माफियाराज असलेल्या बोईसर पुर्वेकडील भागात महसूल विभाग असो किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे सर्वच याभागात दुर्लक्ष करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण याठिकाणी झालेले दिसून येते. महिन्याकाठी महसूल अधिकाऱ्यांना कागदी वजनदार कव्हर मिळाल्यानंतर कायदा देखील बेकायदेशीर खदानी, प्रदूषणकारी क्रशर, डांबर प्रकल्पांचे काहीही करू शकत नाही. यामुळे क्रशर मशीन मधुन हवेत उडणारी दगडी पावडर व डांबर प्रकल्पातून निघणारा कार्बन नागरीकांचे श्वास रोखून धरत आहे.
बोईसर पुर्वेला उभ्या राहिलेल्या नियमबाह्य क्रशर व डांबर प्रकल्प नागरीकांच्या जिवावर उठले आहेत. दिवस रात्र सुरू असणाऱ्या प्रदूषणकारी प्रकल्पांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. तात्पुरती बिनशेती परवानगी देवून याठिकाणी क्रशर उभारणीसाठी महसूल विभागाचे अधिकारी तत्पर असतात. प्रकल्प उभारणीची सुरूवात होताच येथील अधिकाऱ्यांना कागदी वजनदार कव्हर दिले जाते. त्यानंतर मग कितीही दगड पिसा कोणीही स्वामित्वधनाचा परवाना विचारायला देखील येणार नाही. असाच प्रकार नागझरी भागात सर्वच ठिकाणी दिसून येईल. नागरिकांनी तक्रारी केल्या तरी त्याकडे प्रशासन विशेष लक्ष देत नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर (दोन) च्या अधिकाऱ्यांना अनेक तक्रारी येथील प्रदूषणाबाबत झाल्या मात्र दगडी पावडर मधून निघणाऱ्या सोनेरी धुरामुळे त्यांचे मन याठिकाणी कारवाई साठी होत नाही. यामुळे नागझरी भागात हवेच्या प्रदूषणात वाढ झालेली दिसते.
पालघर तहसीलदार कार्यालय व बोईसर मंडळ अधिकारी कार्यालयाचे विशेष हितसंबंध असलेल्या क्रशर मालकांन विरोधात किती आरडाओरडा केला तरी त्याला बगल देण्यात अधिकारी माहिर आहेत. असाच प्रकार नागझरी भागात असलेल्या मिलन रोड बिल्टेक लाईन स्टोन क्रशर बाबत दिसून येतो. कुठल्याही प्रकारची शासकीय नियमांचे पालन याठिकाणी केले जात नाही. दिवस रात्र नियमबाह्य पणे सुरू असलेल्या क्रशर मधून मोठ्या प्रमाणात दगडी पावडर उडताना दिसते. यातच मिलन रोड बिल्टेक लाईन स्टोन क्रशर मालकांने याठिकाणी असलेली जुनी क्रशर विकत घेवून त्याठिकाणी नवीन प्रकल्प उभारला. प्रकल्प उभारताना स्थानिक ग्रामपंचायतीची देखील परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच जागेची तात्पुरती बिनशेती मुदत संपली होती. स्थानिकांनी पालघर तहसीलदार व बोईसर मंडळ अधिकारी यांच्या कडे तक्रार देवून देखील येथील अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई बेकायदेशीर चालणाऱ्या क्रशरवर केलेली नाही.
◾नियमांना बगल
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार क्रशर प्रकल्प सुरू करण्याची परवानगी देताना त्याठिकाणी दगड पावडर हवेत उडू नये यासाठी पाण्याचे फवारे, प्रकल्पाला बंदोबस्त आवरण तसेच क्रशर प्रकल्पा पासून मुख्य रस्त्यावर वाहने येण्यासाठी पक्का रस्ता असे अनेक नियम आहेत. मात्र प्रकल्प सुरू करण्याची परवानगी देताना त्याकडे सोईस्कर पणे दुर्लक्ष केले जाते. परिणामी दगड पावडर मोठ्या प्रमाणात हवेत उडून आजूबाजूला असलेल्या नागरी वस्ती मध्ये जाते. यातच याभागात नागरिकांना श्वासनाचे आजार बळावत आहेत.
◾ नागझरी येथे सुरू असलेल्या नियमबाह्य मिलन बिल्टेक क्रशरचे बाबत पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच प्रदूषण बाबत चित्रीकरण त्यांना पाठवले असताना त्यांनी ते बघून देखील कोणतेही उत्तर दिलेले नाही.