शेतमालाच्या विक्रीसाठी असलेल्या मर्यादित वेळेत जांभळाची विक्री बाबत शेतकरी साशंक.
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: पालघर तालुक्यातील जांभूळ गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहाडोली गावात जांभळाच्या झाडांना टपोऱ्या जांभळाचा बहर आला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध लागू असल्याने ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न गंभीर झाला आहे. परंतु जांभूळ विक्रीतून चांगलं उत्पन्न मिळणार असल्याने येथील शेतकरी आंनदित झाला आहे. परंतु निर्बंधांमुळे शेतमाल विक्रीसाठी ठरवून दिलेली वेळ कमी पडणार असल्याने जांभळाच्या विक्रीचा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.याकडे कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पालघर तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या बहाडोली गावात मोठ्या प्रमाणात जांभळाची झाडे आहेत, त्यामुळे बहाडोली गावाला जांभूळ गाव म्हटले जाते.येथील जांभूळे प्रसिद्ध आहेत.एप्रिल महिन्याच्या अखेरीस जांभळाच्या झाडांना फळे आली आहेत.जांभळाच्या विक्रीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने बहाडोली गावातील बहुतेक शेतकऱ्यांकडे जांभळाच्या झाडांची बाग आहे.
बहाडोलीची काळी, टपोरी ,चवदार जांभुळ प्रसिद्ध असल्याने जांभळांना वसई आणि मुंबई बाजारपेठेत मोठी मागणी असते.बहाडोली सारखे दर्जेदार जांभूळ इतर ठिकाणी मिळत नाही.सुमारे दोन हजार लोकवस्ती असलेल्या या गावातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.शेती सोबत जांभळाच्या विक्रीतून येथील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.बहाडोली मध्ये दीड ते दोन हजार जांभळांची झाडे असुन एका झाडापासून हंगामात सुमारे पन्नास हजार रुपयाचे उत्पन्न मिळते.
एप्रिल महिन्याच्या अखेरीस जांभळाचे उत्पादन सुरू होऊन जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत चालतो.एका टोपलीतील दीड ते दोन किलो जांभळाचा भाव शहाशे ते सातशेच्या घरात असतो. कमी प्रतीची आणि झाडावरुन खाली पडून फुटलेली जांभळे टिपून त्यांचा रस तयार केला जातो. तसेच जांभळाच्या बियांची पावडर तयार केली जाते.जांभळाच्या बियांची पावडर मधुमेहावर गुणकारी असल्याने पावडरलाही मागणी असते. काही शेतकरी सुकलेल्या जांभळापासुन अर्क तयार करून विकतात.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू आहेत. यंदा जांभळाची झाडे टपोऱ्या जांभळांनी बहरली आहेत.परंतु मर्यादित वेळेत जांभळाची विक्री कशी करणार असा प्रश्न जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. गेल्या वर्षी आणि यंदाही जांभळाच्या हंगामात निर्बंध सुरू असल्याने शेतकरी निराश झाले आहेत.त्यामुळे जांभळाच्या विक्रीसाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढे येण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
■मुंबई अहमदाबाद महामार्गावर धुंदलवाडी, वरई फाटा आणि वसई फाटा या तीन ठिकाणी जांभूळ विक्रीसाठी बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.बहाडोली मध्ये जांभळाचे लागवडीखालील क्षेत्र कमी असल्याने राज्यस्तरीय बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी अडचणी आहेत. जांभळापासून वाइन,अर्क आणि रस आदी बाय प्रोडक्ट तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी गटाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येत आहे. जांभळाच्या भौगोलिक मानांकना बाबत शेतकऱ्यांकडून माहिती मागविण्यात आली आहे.
— दिलीप नेरकर
उपविभागीय कृषी अधिकारी, पालघर.