◾बोईसर पोलिसांनी काय केला नेमका तपास; तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील यांनी बेकायदेशीर पणे दिली ताब्यात असलेल्या आरोपीला मुभा
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: गेल्या दोन चार दिवसापासून चर्चेत असलेल्या बोईसर मधील तुंगा प्रकरणात नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. यातील बोईसर पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी प्रशांत संखे यांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना सोमवारी रात्रीच्या वेळी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि मंगळवारी दुपारी हा विषय पालघर दर्पणच्या हाती लागल्याने नेमके कारण शोधण्यासाठी रुग्णालयात गेल्यावर काही वेळेतच त्यांना पुन्हा बोईसर पोलीस ठाण्यात आणल्याने हा प्रकार नेमका काय याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोध घेणे गरजेचे आहे.
बोईसर पोलिसांनी ठरवले की ते काहीही करू शकतात याची पुन्हा प्रचिती आली आहे. तुंगा व्यवस्थापकाना मारहाण प्रकरणी अटकेत असलेले प्रशांत संखे यांचा न्यायालयाने जामीन फेटाळून लावल्याने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी रात्री पोलिसांच्या म्हणण्यानुसार प्रशांत संखे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नागझरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी कायद्यानुसार सरकारी रुग्णालयात नेण्याचे टाळले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. कारण नागझरी येथील रुग्णालयात पोलीस उपचारासाठी थेट घेवून आल्याचे तेथील डाँक्टरांनी सांगितले आहे. सोमवारी रात्री 12:30 च्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यावेळी त्यांचा रक्तदाब हा 120/170 असल्याचे डाँक्टरांनी पालघर दर्पण सोबत बोलताना सांगितले. यातच इसीजी मध्ये देखील बदल असल्याचे डाँक्टरांचे म्हणणे होते. परंतु इसीजी अहवालात मध्ये छातीचे ठोके हे प्रमाणात असल्याचे दिसून आले. मात्र तरीही विशेष खोलीत त्यांना उपचारासाठी ठेवले होते.
कायद्यानुसार एखाद्या आरोपीची प्रकृती पोलीस कोठडीत बिघडली तर त्यावर उपचारासाठी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. प्राथमिक तपासणी झाल्यानंतर जर त्याठिकाणी सुविधा नसतील तर सरकारी रुग्णालय ज्याठिकाणी सांगेल त्याठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात येते. म्हणजे आजवर सर्वसामान्य आरोपींना ज्या पद्धतीने कायदेशीर वागणूक असते त्यावरून हे आपण सांगु शकतो. याबाबत बोईसर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांना संपर्क साधकाला असता ते इतर कामात व्यक्त असल्याने त्यांंचे सहकारी दादा शिंदे यांनी पालघर दर्पण सोबत संवाद साधला यावेळी बोईसर सोडून नागझरी येथे खाजगी रुग्णालयात दाखल करणे, कायदेशीर बाबी कडे करण्यात आलेले दुर्लक्ष अशा अनेक गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्या मात्र याचे उत्तर काही मिळू शकले नाही. यातच या प्रकरणाचे तपास अधिकारी संदीप पाटील यांना संपर्क साधून देखील त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.
बोईसर पोलिसांनी नेहमी प्रमाणे वजनदार आरोपींना दिलेली सुट यात काही नवल वाटण्याचे कारण नाही. ज्यांचे वजन जास्त अशांना कोणताही गुन्हा करा जामीन होईपर्यंत कोणताही त्रास पोलिसांन कडून होत नाही. पालघर दर्पणने उपस्थित केलेल्या प्रश्नांन पासुन पळ काढणारे पोलीस यांनी काही तासातच प्रशांत संखे यांना नागझरी येथील रुग्णालयातुन थेट पोलीस ठाण्यात आणले. महत्त्वाचे म्हणजे ज्यावेळी दुपारी नागझरी येथील खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांना प्रकृती बाबत विचारणा केली असता त्यांनी प्रशांत संखे यांना आज मंगळवारी सोडणार नसल्याचे सांगितले. परंतु बोईसर पोलिसांना त्यांनी केलेले नियमबाह्य कामाची जाणीव झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने नागझरी येथील रुग्णालयात येवून प्रशांत संखे यांना बोईसर पोलीस ठाण्यात तातडीने घेवून गेले. यावेळी उपचाराचे देय हे त्यांच्या भावाने भरले आहे. जर त्यांची प्रकृती खरोखरच सुधारलेली नव्हती असे डाँक्टरांचे म्हणणं होत तर मग पोलीस ठाण्यात नेण्यापुर्वी सरकारी दवाखान्यात का नेण्यात आले होते का असे अनेक प्रश्न या प्रकरणात उपस्थित होतात.
◾तपास अधिकारी संदीप पाटीलांन कडून मुभा..
तुंगा रुग्णालयात व्यवस्थापकाला झालेल्या मारहाणीत अनेक इसम सिसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत असताना गुन्ह्यात त्यांची नोंद झालेली नाही. प्रशांत संखे व इतर दोन आरोपी असेच पोलिसांनी सांगितले आहे. इतरांना मोकळीक देवून तपास अधिकारी संधी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत का ? वजनदार आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले नसून इतर खोलीत ठेवल्याची माहिती समोर येत असल्याने नेमकी सत्यता समोर येण्यासाठी सिसीटिव्ही चित्रीकरण तपासणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. यामुळे या महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक यांनी सक्षम अधिकाऱ्यांना सोपवियाची आवश्यकता आहे.
◾तुंगा रूग्णालयात उपचारासाठी अधिक रक्कम घेतली जात आहे. तसेच प्रशांत संखे यांच्यावर दाखल केला गुन्हा व लावण्यात आलेले कलम चुकीचे असल्या बाबत समाज माध्यमातून जोरदार चर्चा सुरू आहे. प्रशांत संखे स्वतः अँडमिन असलेल्या एका व्हाट्सएप ग्रुपमध्ये याबाबत खडाजंगी सुरू आहे. यामुळे आता भाजपाचे पदाधिकारी देखील सोशल मिडिया ग्रुपमध्ये सक्रिय झाले असून संखे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेध भाजप कडून केला जात आहे.