◾ पोलीस उपनिरीक्षक राजेश धुमाळ लाचलुचपत विभागाच्या ताब्यात
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: सोन्याची खाण असलेल्या बोईसर औद्योगिक क्षेत्रातील लाचखोर पोलीस अखेर लाचलुचपत विभागाच्या तावडीत सापडला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेश धुमाळ यांनी एका गुन्ह्यातील आरोपीला त्रास होऊ नये यासाठी आरोपीच्या पत्नी कडे लाच मागितली असल्याचे समोर आले असून लाच घेताना ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
बोईसर पुर्वेकडील गुंदले भागातून गावकऱ्यांनी गायीची तस्करी करण्यासाठी आलेल्या लोकांना पळवून लावले होते. या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते. आरोपीला त्रास होऊ नये यासाठी पैशाचा तगादा पोलीस उपनिरीक्षक राजेश धुमाळ यांनी लावला होता. याबाबत तक्रार ठाणे लाचलुचपत विभागाला दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी साधारण 6:30 च्या सुमारास लाच 15 हजार रूपये घेताना पकडले असल्याची माहिती समोर येत आहे. लाचलुचपत विभागाकडून पुढील कारवाई बोईसर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
◾ गायींची तस्करी बाबत दाखल असलेल्या गुन्ह्यात तपासाच्या नावाखाली अनेकांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुंदले भागात पोलीस उपनिरीक्षक राजेश धुमाळ व लिपीक पवार हे याभागात वारंवार येत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. गुन्ह्यात नाव टाकू याबाबत घाबरवून पैशाची उकल केल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. यामुळे या प्रकरणात अधिक तपास झाल्यानंतर संपूर्ण चित्र समोर येण्याची शक्यता आहे.