कोळगाव जेनेसीस औद्योगिक क्षेत्रातील गोदामात सापडला घातक रासायनिक साठा; स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिट कडे तक्रार दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी केला तपास सुरू
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातुन निघालेले घातक रसायनाचा मोठा साठा पालघर कोळगाव जेनेसीस येथील औद्योगिक क्षेत्रात लपविण्यात आला आहे. बेकायदेशीर पणे याठिकाणी मोठ्या प्रमाणात रसायन ड्रम व रासायनिक घनकचरा साठवून ठेवला आहे. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळीची पाहणी करून तपास सुरू केला आहे. याठिकाणी अतिशय उग्र वास असलेला घातक रासायनिक घनकचरा व रसायन बोईसर येथील केमिकल माफियांनी ठेवले असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.
◾ बोईसर पोलिसांच्या हातमिळवणी कारभारामुळे बोईसर अवधनगर भागातील केमिकल माफिया अधिकच सक्रिय झालेले दिसून आले आहेत. स्थानिक पोलिसांन कडून कानाडोळा केला जात असल्याने आता तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रसायन व रासायनिक घनकचऱ्यांचा साठा बेकायदेशीर वाहतूक करून कोळगाव येथील जेनेसीस औद्योगिक क्षेत्रातील गोदामा मध्ये साठवून ठेवल्याचे उघड झाले आहे. बोईसर अवधनगर भागातील “वासीम” व “अजगर” या दोन केमिकल माफियांनी हा रासायनिक घनकचऱ्यांचा साठा याठिकाणी बेकायदेशीर पणे साठवून ठेवल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. या ठिकाणी असलेल्या गोदामाची पाहणी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी दुपारच्या वेळी केली असून याठिकाणी सापडलेले रसायन व रासायनिक घनकचरा कोणत्या कारखान्यांचा आहे. याची माहिती मिळण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला तातडीने पत्र देवून हा साठा कोणी केला याचा तपास सुरू करण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे बोईसर युनिटचे पोलीस उपनिरीक्षक आशिष पाटील यांनी सांगितले.
◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मोल्टास या कारखान्यातील घातक रसायन याठिकाणी आणून टाकल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांन कडून मिळाली आहे. आठ दिवसापूर्वी “वासीम” नावाच्या केमिकल माफियांने हे घातक रसायन कारखान्यातुन बाहेर विल्हेवाट लावण्यासाठी काढल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर अवधनगर येथील केमिकल माफिया “अजगर” यांने त्यांच्या कोळगाव जेनेसीस येथील गोदामात साठा केल्याचे सुत्रांकडून माहिती मिळाली आहे. यातच कोळगाव जेनेसीस याठिकाणी ज्या गोदामात साठा मिळाला आहे त्याठिकाणी साधारण दोन वर्षांपूर्वी पालघर पोलिसांनी देखील कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
◾अतिशय घातक असलेल्या रसायन बाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी वरून देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत उपप्रादेशिक अधिकारी यांना संपर्क साधण्यासाठी सांगितले. मात्र उपप्रादेशिक अधिकारी वारंवार फोन करून देखील प्रतिसाद देत नसल्याने हा घातक रसायनाचा साठा बाबत योग्य ती कारवाई करण्यासाठी विलंब लागत आहे.
◾ प्रदूषणाचा ठपका ठेवून मोल्टास या कारखान्याला बंदीचे आदेश साधारण दोन महिन्यापूर्वी देण्यात आले होते. मात्र प्रदूषणकारी कारखान्यांने आपले प्रदूषण सुरूच ठेवले असून या कारखान्याला स्थानिक क्षेत्र अधिकारी पाठबळ देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.