इधन व वेळेची होतेय बचत मनोरच्या वाहतूक कोंडीला ही होतोय पर्याय
पालघर दर्पण:राजेंद्र पाटील
पालघर: शहर जिल्ह्याचे मुख्यालय झाल्यापासून मुख्यालयाला जोडणाऱ्या मनोर-पालघर रडत्यावर बाहेरून येणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. परंतु याच रस्त्यावर मनोर सारखी मोठी बाजारपेठ असल्यामुळे नेहमीच या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे मुंबई, विरार, वसई व ठाण्याकडे जाणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच व्यापारी वर्ग वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचण्यासाठी धुकटण-बहाडोली-दहिसर-वरई या पर्यायी मार्गाचा वापर सोईस्कर होत आहे.
धुकटन-बहाडोली- दहिसर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे पाच मीटर रुंद आणि आठ किलोमीटर लांबीचा बनविण्यात आल्याने या मार्गाने प्रवास करणे सोयीस्कर झाले असून वेळ, अंतर आणि इंधनाची बचत होत आहे. मात्र पालघर-मनोर रस्त्याने मनोरमार्गे मुंबई, ठाणे व विरार, वसईला जायचे ठरविल्यास १५ किलोमीटर अंतर जास्त पडत असून फेरा पाडतो. त्यातच मनोर येथील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने वेळेची बचत होत नाही. मात्र धुकटण-बहाडोली-दहिसर-वरई रस्त्याचा वापर केल्यास वेळेचीही बचत होऊन वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येते. त्यामुळे या रस्त्याचा वापर चारचाकी व दुचाकी वाहनचालक मोठ्याप्रमाणात करत आहेत. परंतु या रस्यावर वैतरणा नदीवर बहाडोली आणि दहिसर दरम्यान वसई-विरार नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन करिता बांधण्यात आलेले पुल अरुंद आहे. या अरुंद पुलावरून एका वेळेस एकच चारचाकी वाहन जात असल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
प्रसंगी वाहन मागे घेण्यावरून वाहनचालकांमध्ये बाचाबाची होऊन वाद विकोपाला जाण्याचा प्रसंग निर्माण होतो. या अरुंद पुलामुळे विद्यार्थी, प्रवासी व ग्रामस्थांची ही मोठी गैरसोय होत आहे. याच मार्गाने पालघर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, कर्मचारी व वसई-विरार भागातील व्यापारी आणि प्रवासी यांची वाहने जात असल्याने या रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे वैतरणा नदीवरील अरुंद पुलावर वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच मनोरच्या वाहतूक कोंडीला हा मार्ग पर्याय ठरत असल्यामुळे धुकटण-दहिसर रस्त्याची चांगल्या प्रकारे देखरेेेख ठेऊन वैतरणा नदीवर नवीन मोठे पूल बांधण्यात यावे. अशी मागणी परिसरातून पुढे येत आहे.
चौकट :-
मनोर शहरातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १० मीटरपर्यंत करण्यात येणार होते. परंतु ग्रामस्थांच्या आणि व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे मुख्य बाजारपेठेतील रुंदीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. तसेच मनोर-पालघर रस्त्यावर नेटाळी गावापासून साये गावाजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणारा सुमारे तीन किलोमीटर अंतराचा बाह्यवळण रस्ता शासनाच्या विचाराधीन आहे. या बाह्यवळण रस्त्यादरम्यान वैतरणा नदीवर १२० मीटर लांबीचा पूल उभारण्यात येणार असून यासाठी लागणारा निधी केंद्रीय मार्ग निधी सेंटर रोड फंड मधून उपलब्ध होण्यासाठी तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पालघरचे खा. राजेंद्र गावित यांनी वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. परंतु पालघर-मनोर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे.
प्रतिक्रिया:
वसई-विरार महानगरपालिकेमार्फत वैतरणा नदीवरील अरुंद पुलावर वाहतूक नियमन करण्यासाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम एक-दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे.
— सुरेंद्र ठाकरे, अभियंता पाणीपुरवठा विभाग, वसई-विरार महानगरपालिका
धुकटण-बहाडोली-दहिसर रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. या रस्त्याच्या दरजोन्नतीचा प्रस्ताव शासनालकडे पाठविण्यात येणार आहे.
— महेंद्र किणी, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर