बोईसर : शिवकृपा सहकारी पतपेढी बोईसर शाखेतर्फे महिलांचा सन्मान करत महिला दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील चांगली कामगिरी बजावलेल्या महिलांना कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते. यावेळी ठिणगी सामाजिक सेवा संस्थेच्या अध्यक्ष डॉ. स्मिता माळवदे, उद्योजिका उर्मिला काटकर, व अतिशय कमी वयातच निर्भीडपणे पत्रकारिता करून पालघर जिल्ह्यात आपला ठसा उमटविणारी पत्रकार सुनंदा खडपकर या देखील प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
शिवकृपा सहकारी पतपेढीने महिलांना सन्मानित करून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना स्मिता माळवदे यांनी महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे सांगून काळजी कशा प्रकारे घ्यावी याचे मार्गदर्शन केले. तर महिलांसाठी असलेल्या कायद्यां विषयी मार्गदर्शन करत. स्त्री विषयीची जुनाट मानसिकता बदलून आजच्या स्त्रियांनी स्वावलंबी बनले पाहिजे असे सुनंदा खडपकर यांनी सांगितले. त्याच बरोबर बचत करून पथपेढी द्वारे कशा प्रकारे नवीन उद्योग सुरु करू शकतो या बाबत उर्मिला काटकर यांनी माहिती दिली.
महिलांना संस्थेचे शाखा अधिकारी सत्यवान झुरळे यांनी संस्थेच्या कार्यक्रमाची माहिती दिली. त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष कृष्णा शेलार व उपाध्यक्ष वसंत चव्हाण यांनी संस्थेच्या १०० शाखांमध्ये महिला दिनाच्या स्तुत्य उपक्रम राबिवल्याचे झुरळे यांनी सांगितले. शाखा पर्यवेक्षक कुंडलिक पवार यांनी शाखेची माहिती देत संस्थेच्या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी सुलभा वीरकर, पुष्पा पन्हाळकर, मेघाली रणनवरे, हिराबाई चव्हाण व संस्थेचे कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.