◾ पालघर शहरी भागा सह ग्रामीण भागात देखील पावसाचा तडाखा
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ सुरूच ठेवल्याने किनारपट्टीवरील अनेकांच्या घराचे नुकसान होत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील अनेकांचे नुकसान झाले आहे. तोक्ते या चक्रीवादळाने किनारपट्टीवर धडक न देता
समुद्रातूनच आपली मार्गक्रमणा सुरू ठेवीत गुजरात च्या दिशेने गेल्याने जिल्हा वासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. परंतु जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले असून संपूर्ण भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
केरळ च्या समुद्रातून निर्माण झालेले तोक्ते हे चक्रीवादळ 15 ते 17 मे दरम्यान मुंबई,पालघर सह कोकण किनारपट्टीवर धडक देऊ शकत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने सर्वत्र हाय अलर्ट घोषित केला होता. समुद्रातून चक्रीवादळाचे गुजरात च्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाचे पडसाद जिल्ह्यातील किनारपट्टी भागात दिसू लागले आहेत. सोमवारी सकाळी 8.15 वाजल्यापासून सुरू असलेला पाऊस आणि जोरदार वाऱ्याने आपला जोर मंगळवारी दुपारी 2 वाजे पर्यंत कायम ठेवला होता. पूर्वेकडून अचानक पणे सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने किनारपट्टीला झोडपून काढले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद असल्याने प्लास्टिक कापड उपलब्ध न झाल्याने अनेकांच्या झोपड्यात पावसाचे पाणी शिरून जीवनावश्यक वस्तू आदींचे नुकसान झाले. ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मात्र मंगळवारी दुपारी थोड्याफार प्रमाणात शांत झालेल्या परिस्थिती नियंत्रणात राहिली आहे.
◾पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळी पावसामुळे मच्छीमारांचे नुकसान झाले आहे. माहीम टेंभी येथील मुकेश किशोर तांडेल यांच्या मालकीची समुद्रात नांगरून ठेवलेली नवदुर्गा बोट बुडाली असून इतर दोन बोटींचे ही नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून उंच लाटा उसळत आहेत.
◾जिल्ह्याची बत्ती गुल
सोसाट्याच्या वाऱ्यासह सोमवारी पासुन सुरू झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. अनेक भागात विद्युत पोल, तारा तुटल्या असल्याने गेल्या सोमवार पासून संपूर्ण भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. ग्रामीण भागा बरोबर शहरातील देखील विद्युत पुरवठा खंडित झाला असून विजपुरवठा सुरळीत सुरू करण्यासाठी महावितरण विभागाचे कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत आहेत. परंतु सतत सुरू राहणाऱ्या पावसामुळे कामामध्ये अडचणी येत असल्याचे समोर आले आहे.
◾ बोईसर- पालघर, बोईसर- तारापूर या मुख्य रस्त्यावर बरोबर इतर भागात देखीलमोठ्या प्रमाणात झाडे तुटून पडली होती. स्थानिकांच्या मदतीने ही झाडे हटवून वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. बोईसर पालघर रस्त्यावर नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या पुलाच्या कामासाठी बाजूला तात्पुरता बांधण्यात आलेला रस्ता वाहुन गेल्याने बोईसर कडून पालघर कडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.
◾ जिल्ह्यात सुरू असलेल्या कोविड रुग्णालयांना जनरेटर पुरवठा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने रुग्णांना त्याचा फटका बसु नये यासाठी हे महत्त्वाचे काम तातडीने करण्यात आले आहे. तसेच डिजेल व पेट्रोल चा राखीव साठा जनरेटर साठी व अत्यावश्यक सेवेसाठी ठेवावा असे आदेश पालघर जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.