◾ वादळी पावसामुळे तुटलेले विद्युत पोल व ताराची दुरुस्ती युध्दपातळीवर सुरू; बोईसर बरोबर पास्थळ, सालवड, कुरगाव, पाचमार्ग, अक्करपट्टी, तारापूर अशा अनेक भागात आजची रात्र देखील अंधारात
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: वादळी पावसाचा जोरदार तडाखा शहरी भागा बरोबर किनारपट्टी भागाला देखील बसला असून या संपूर्ण भागातील विद्युत पुरवाठा सोमवार पासून बंद झाला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मोबाईल, इंटरनेट सेवा देखील खंडित झाली आहे. एकिकडे महावितरणचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी प्रयत्न करत असले तरी मोठ मोठ्या तुटलेल्या झाडांमुळे व तुटलेल्या पोल मुळे आजची रात्र देखील अंधारात काढावी लागणार आहे.
तौक्ते वादळाच्या प्रभावामुळे सोमवारी सकाळी पासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला. औद्योगिक क्षेत्र असलेल्या बोईसर तारापूर भागात देखील विद्युतपुरवठा साधारण 32 तास उलटून गेले असतानाही सुरू झाला नसल्याने याठिकाणी अनेक कामांवर त्यांचा परिणाम झालेला दिसून आला. दुरध्वनी सेवे बरोबरच इंटरनेट सेवा देखील बंद झाली असून केबल नेट देखील पुर्ण पणे बंद झाले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. इंटरनेट सेवा खंडित झाल्याने आँनलाईन बँकेचे संपूर्ण व्यवहार नागरिकांना दिवसभर करता आले नाहीत. नागरीकांच्या घरातील इन्व्हर्टर देखील संपल्याने रात्री पासुनच अंधारात राहावे लागले आहे. काही ठिकाणी नागरिकांनी दुरध्वनी सुरू करण्यासाठी आपल्या कारच्या बँटरीचा आधार घेतला आहे.
बोईसर परिसरात औद्योगिक क्षेत्र असल्याने याभागाला मोठे महत्त्व आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत असून विद्युत पुरवठा खंडित झाल्याने बंद पडलेल्या बोअरवेल मधील मोटारी यामुळे सदनिका मध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा वाहिनीवर देखील परिणाम झाला असून लाखो लिटर पाणीपुरवठा करणारी वाहिनी बंद पडलेली आहे. बोईसर परिसराचा विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत वेळ लागणार असल्याचे महावितरणाच्या बोईसर विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र नक्की विद्युतपुरवठा सुरू होईलच याबाबत ठाम पणे त्यांना देखील सांगता आले नाही. बोईसर बरोबर पास्थळ, सालवड, कुरगाव, पाचमार्ग, अक्करपट्टी, तारापूर, दांडी, पथराळी अशा अनेक भागात आजची रात्र देखील अंधारातच घालवावी लागणार आहे.
◾ मोठ्या प्रमाणात तुटलेले पोल व विद्युत तारा याची दुरुस्ती केली जात असून सतत येणाऱ्या पावसामुळे यामध्ये अडचणी येत आहेत. तसेच मोठ मोठ्या झाडांच्या फांद्या वाहिनीवर पडल्याने ते हटविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू असून बोईसर भागाचा विद्युत पुरवठा रात्री उशिरा पर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न आहेत.
— रूपेश पाटील, उप अभियंता , महावितरण बोईसर विभाग