◾गोठा कोसळुन तीन म्हैशींचा मृत्यू, दोन घरे आणि एक विहीर कोसळली; अनेक घरांच्या छताचे नुकसान
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: तोक्ते चक्रीवादळाचा ग्रामीण भागाला जोरदार तडाखा बसला आहे.रविवारी रात्री पासून सुरू झालेल्या वादळाने सोमवारी पहाटे पासून जोर धरला होता. रात्रभर वादळी वारे आणि पाऊस सुरू होता. मंगळवारी दुपारनंतर वादळाचा जोर कमी झाला होता. मनोर मंडळ क्षेत्रातील अनेक गावांमध्ये राहत्या घरांच्या छताचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून नुकसानीचा आढावा तसेच पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रविवारी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित असल्याने मोबाईल सेवा विस्कळीत झाली असून बँकांच्या व्यवहारावर परिणाम झाला आहे.दुबार भातशेती, आंबा, जांभूळ आणि भाजीपाला शेतीचे वादळात मोठे नुकसान झाले आहे.मनोर बाजारपेठ,तामसइ फाटा आणि नेटाळी भागात पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते.जोरदार पावसामुळे ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत होते.
दरम्यान मनोर ग्रामपंचायत हद्दीतील काजुपाड्याच्या मंजुळा पऱ्हाड यांच्या घराचा काही भाग वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळून नुकसान झाले आहे.यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.कोंढाण गावातही एक घर कोसल्याची माहिती समोर आली आहे.नांदगाव तलाठी सजा हद्दीत एक गोठा कोसळून तीन म्हैशी आणि एका वासराचा मृत्यू झाला आहे.सोमवारी रात्री महामार्गावरील टेन नाक्यावरील सी-कांत पेट्रोल पंपाचा लोखंडी होर्डिंग वाऱ्यामुळे उभ्या कार वर कोसळला होता.यात कारचे मोठे नुकसान झाले आहे.
मनोर मंडळ क्षेत्रातील दहिसर,सतीवली, ढेकाळे, दुर्वेस,मनोर,नांदगाव, गोवाडे आणि मासवन तलाठी सजा हद्दीतील अनेक गावांमध्ये घरांचे छप्पर आणि घरावर झाडे कोसळल्याने नुकसान झाल्याची माहिती मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे यांनी दिली. वीटभट्टीधारकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
दहिसरतर्फे मनोरच्या डेवणी पाडा,धुकटन,दुर्वेसचा खराट पाडा,वाडाखडकोणा,आवंढाणी,ढेकाळे, कुडे आदी गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे घराचे छप्पर उडून गेल्याने तसेच घरावर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. सकाळपासून वादळी वाऱ्या पाऊस सुरू होता.महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
वादळी वारा आणि पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. मनोर परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली भाजीपाल्याची लागवड ध्वस्त झाली आहे. वादळी वाऱ्यात जांभळाच्या झाडांची मोठी पडझड झाली असून जांभळाचे हिरवे फळ गळून पडले आहे. बहाडोली गावात अनेक जांभळाची झाडे उन्मळून पडली आहेत.वांद्री धरण सुर्या धरणाच्या पाण्यावरील दुबार भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील भातपिक आडवे होऊन भिजले आहे. शेतात पाणी भरून राहिल्याने भातपीक कुजण्याची शक्यता आहे.