वीजपुरवठयाच्या प्रतीक्षेत ग्राहक,महावितरण कर्मचाऱ्यांचे असहकार्य; ढेकाळे फिडर 90 तासापासून अंधारात.
पालघर दर्पण: नाविद शेख
मनोर: तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात ग्रामीण भागाला वीजपुरवठा करणारी महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे.त्यामुळे गेल्या 72 तासांपासून महामार्गावरील सावरखंड उप केंद्रा अंतर्गत मनोर आणि भोपोली फिडर वरील अनेक गावे अंधारात आहेत.ढेकाळे फिडरवर चार दिवसांपासून बत्ती गुल झाली आहे.विजे अभावी मोबाईल सेवेवरही परिणाम झाला आहे,तसेच उकाड्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.अभियंत्यांचे फोन बंद असून महावितरणकडून ग्राहकांना वीजपुरवठया बाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. ग्रामीण भागात महावितरण विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनोर परिसरात रविवारी रात्री पासून चक्रीवादळाने जोर धरला होता.वादळी वारा सुरू होताच रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास सावरखंड उप केंद्रातील ढेकाळे,इंडस्ट्रीअल,भोपोली आणि मनोर वीजपुरवठा खंडित झाला होता.सोमवारी सकाळी उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या 33 केव्ही मुख्य विजवाहिनीत बिघाड झाल्याने उपकेंद्र ठप्प झाले होते. दोन दिवस चक्रीवादळाने तडाखा दिल्याने अनेक ठिकाणी विजवाहिण्या तुटून पडल्या तर अनेक खांब जमीनदोस्त झाले होते.त्यामुळे सावरखंड उपकेंद्राअंतर्गत असणारे पंचवीस हजार ग्राहक अंधारात होते.
मंगळवारी दुपारी चक्रीवादळाचा जोर ओसरल्यानंतर महावितरणचे कर्मचारी ऍक्शन मोडमध्ये आले होते.मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उप केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीवरील बिघाड दूर करून उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. परंतु पडलेले खांब आणि तारांबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नेमकी माहिती नसल्याने चारही फिडर वरील वीजपुरवठा सुरू करण्यात आला नाही.बुधवारी सायंकाळी भोपोली फिडर आणि उशिरा मनोर फिडर वर वीजपुरवठा सुरू करण्यात आला.मनोर आणि भोपोली फिडर वरील अनेक गाव पाडे गुरुवारी सायंकाळ पर्यंत अंधारात असल्याची माहिती पुढे येत आहे.
सुमारे साडे चार हजार ग्राहक असलेले महामार्गावरील ढेकाळे फिडरचा वीजपुरवठा चार दिवसानंतरही सुरू करण्यात आला नाही.मोठ्या प्रमाणात विजवाहिनी आणि खांबांची हानी होऊनही ढेकाळे फिडर वर तीन दिवस दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले नसल्याची माहिती महावीतरणच्या कार्यालयातून देण्यात आली. गुरुवारी सकाळ पासून कंत्राटदाराच्या दहा कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अभियंता संजय कोल्हे यांनी दिली. ढेकाळे फिडरचा वीजपुरवठा शुक्रवार पर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता व्यक केली जात आहे.पाच दिवस वीजपुरवठा नाही, अशात महावितरण कडून वीजपुरवठया बाबत कोणतीही सूचना दिली जात नाही.त्यामुळे ग्रामीण भागात महावितरणच्या कार्यपद्धती बाबत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
■मंगळवारी सायंकाळी तुटलेल्या तारा आणि खांब यांची पाहणी करून दुरुस्तीचा आराखडा तयार करण्याऐवजी एक महिला शाखा अभियंता उपकेंद्रात कर्मचाऱ्यांसोबत गप्पा मारत बसल्या होत्या.
■वादळात सावरखंड उपकेंद्रातील कोलमडलेली वीज यंत्रणा दुरुस्तीच्या कामाबाबत कोणताही आराखडा महावितरणकडे नसल्याने वीज ग्राहकांच्या गैरसोयीत वाढ.
■कंत्राटदाराच्या जीवावर महावीतरण उदार !!
सावरखंड उप केंद्रांत एककंत्राटदार आणि त्याच्या दहा लोकांचे मनुष्यबळावर उपकेंद्रा अंतर्गत कोलमडलेली वीज यंत्रणा दुरुस्ती करून घेतली जात आहे. चार दिवसांपासून हजारो ग्राहक अंधारात असताना महावितरण कडून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करण्यात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.