◾ जमीनी खालील विद्युत वाहिनी नादुरुस्त झाल्याने भंडार वाडा, काटकर पाडा, गणेश नगरचा भाग अंधारातच
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: दोन दिवसाच्या पावसांने बोईसरकरांची झोप उडवली असून संपूर्ण बोईसर भागातील विजपुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. बोईसर मधील काही भागातील विजपुरवठा दोन दिवस अगोदर सुरू झाला असला तरी आदिवासी व ग्रामीण भाग असलेल्या भागात अद्यापही विजपुरवठा सुरू झालेला नाही. महावितरणाच्या ठेकेदारांनी केलेली निकृष्ट दर्जाची कामे यामुळे थोड्याच पावसात नादुरुस्त होणारी उपकरणे याचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे.
बोईसर शहर म्हणून ओळखले जात असले तरी नियोजन शुन्य कामामुळे गेल्या पाच दिवसापासून येथील परिसर अंधारात आहे. दोन दिवसापूर्वी येथील काही भागात विजपुरवठा सुरू झाला असला तरी भंडार वाडा, काटकर पाडा, गणेश नगरचा भाग अद्यापही अंधारातच आहे. विज नाही यामुळे येथे पिण्यासाठी देखील लोकांना पाणी उपलब्ध नाही. सकाळी उठल्यापासून शौचालया पासून ते आंघळीसाठी देखील पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. गुरुवारी सायंकाळी बोईसरच्या दुसऱ्या वाहिनीवरून विजपुरवठा भंडार वाडा, काटकर पाडा, गणेश नगर याभागाला देण्यात आला होता. परंतु प्रमाणापेक्षा अधिक दाब विद्युत वाहिनीवर येत असल्याने संपूर्ण भागाची विज जात होती.
बोईसर शहरात विजपुरवठा करण्यासाठी टिएपीएस सबस्टेशन येथून केबल द्वारे दोन विद्युत वाहिन्या जमीनी खालून टाकण्यात आल्या आहेत. यातील एका वाहिनीवरून बोईसरचा शहरी भाग तर दुसऱ्या वाहिनीवरून भंडार वाडा, काटकर पाडा, गणेश नगर या भागाचा समावेश असलेली वाहिनी नादुरुस्त झाल्याने याभागाला विजपुरवठा होत नाही. जमीनी खालून टाकण्यात आलेली वाहिनी साधारण अर्धाकिलोमिटर अंतरावर नादुरुस्त झाल्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शोधण्याचे काम सायंकाळी उशिरा सुरू करण्यात आले होते. तत्पूर्वी विजपुरवठा खंडित झालेल्या भागाला बोईसरच्या दुसऱ्या वाहिनीवरून विजपुरवठा देण्यात आली होता. मात्र प्रमाणापेक्षा जास्त विजेचा दाब येत असल्याने संपूर्ण भागाचा विजपुरवठा वारंवार खंडित होत होता. महावितरणाची कामेच ठेकेदारांन कडून दर्जाहीन केली जात असल्याने याचा नाहक त्रास नागरीकांना भोगावा लागत असून संपूर्ण बोईसरचा विजपुरवठा सुरळीत होण्यासाठी नेमका किती अवधी लागणार याबाबत महावितरणचे अधिकारी देखील सांगु शकले नाही.
◾ पाच दिवस उलटून देखील विजपुरवठा सुरू होत नसल्याने काटकर पाडा व भंडारा वाडा येथील नागरिक हैराण होऊन रस्त्यावर आले होते. गुरूवारी सायंकाळी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना गाठून त्यांना विजपुरवठा सुरू होण्याबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी तात्पुरता सुरू झालेला विजपुरवठा काही वेळातच पुन्हा खंडीत झाला. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत माजी पंचायत समिती सदस्य मुकेश पाटील यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना प्रथम प्राधान्य देवून बोईसर भागाचा विजपुरवठा सुरू करावा याबाबत सांगितले.
◾ बोईसरचा विद्युतपुरवठा करणाऱ्या जमीनी खाली असलेल्या दोन केबल वाहिन्या मधील एक वाहिनी नादुरुस्त झाल्याने विजपुरवठा करण्यासाठी अडचणी येत आहेत. एकाच वाहिनीवरून विजेचा प्रवास सुरू केल्यानंतर देखील लोड घेत नसल्याने विजपुरवठा खंडित होत आहे. अत्याधुनिक यंत्राचा वापर करून नादुरुस्त केबलचा भाग तपासणी करून तातडीने दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे महावितरण बोईसर विभागाचे उप अभियंता रूपेश पाटील यांनी पालघर दर्पण सोबत बोलताना सांगितले.