◾ रस्ता आमचा नाही आम्ही फक्त काम करतोय उप अभियंता बडगेची मुक्ताफळे; महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बेशिस्त अधिकाऱ्यांन मुळे रस्त्यांचे भिजते घोंगडे कायम
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्राला जोडणारा बोईसर चिल्हार रस्ता राज्य महामार्ग सद्या बेवारस अवस्थेत असून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारा हा मुख्य रस्ता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्त करण्यात आला होता. त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या जागेचे भूसंपादन करून या रस्त्यावर बांधकाम करण्यात आले. मात्र आता हा रस्ता आमचा नाही आम्ही फक्त काम करतो असे बेजबाबदार पणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
बोईसर चिल्हार रस्त्यांचे चौपदरीकरण करण्याचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत सुरू असून महामंडळाच्या बेजबाबदार कार्यपद्धती मुळे हा रस्ता अनेक भागात खोळंबुन पडला आहे. या रस्त्यांच्या दुर्तफा असलेल्या जागेचे भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडून करण्यात आले असले तरी स्थानिक जागा मालकांनी अनेकदा रस्त्यांचे काम बंद पाडले होते. रस्त्याचे काम होताना होणाऱ्या विरोधा नंतर याठिकाणी गैरमार्गाने तडजोड देखील करण्यात आल्या. यातच नागझरी भागात मुख्य चौकात या रस्त्यांचे काम रखडले असून येथील काही जागा मालकांनी जागेचा मोबदला मिळाला नाही जागेवर आमची मालकी आहे, असे कारण पुढे करून अत्यावश्यक असलेल्या रस्त्यांचे काम रोखून धरले आहे. मात्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी देखील एखाद्या ठिकाणाहून विरोध झाला की काम बंद करून शांत बसण्याची भुमिका बजावत असल्याने असल्या बेजबाबदार अधिकाऱ्यांन मुळे हा रस्ता खोळंबुन राहिला आहे.
नागझरी नाका येथे स्थानिकांनी रस्त्यांचे काम वारंवार बंद पाडल्याने याठिकाणी अनेक अपघात होतात. यातच दोन दिवसापूर्वी एका मालवाहू ट्रक खाली येवून एक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर येथील रस्त्यांच्या कामाला विरोध करणाऱ्यांनी याठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून बेकायदेशीर पणे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच दोन दुभाजक बनवले. विशेष म्हणजे याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना देखील माहिती नव्हते. अपघात होत असलेल्या क्षेत्रातील रस्ते अद्यावत करणे गरजेचे असताना व त्याठिकाणी भरधाव येणाऱ्या वाहनांवर नियंत्रण आणणे गरजेचे असताना त्याकडे देखील प्रशासन दुर्लक्ष करते. मात्र काही लोकांनी याठिकाणी टाकलेले दुभाजक वेगाने येणाऱ्या वाहनांना दिसत नसल्याने याठिकाणी अपघातांची अधिकच स्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी फक्त मज्जा बघून कागदी घोडे नाचवत असल्याने अत्यावश्यक असलेला रस्त्या आजूनही पुर्ण होऊ शकला नाही.
◾ नागझरी याठिकाणी टाकण्यात आलेले गतिरोधक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नसल्याने ते तातडीने हटविणे गरजेचे होते. मात्र याकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. याबाबत अधिक माहिती विचारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उप अभियंता संदीप बडगे यांना संपर्क साधला असता त्यांनी बेजबाबदार पणे उत्तर देत “हा रस्ता आमचा नाही आम्ही फक्त रस्त्यांचे काम केले आहे. रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे. मी त्यावेळी अधिकारी असतो तर हा रस्ता बनवलाच नसता. हा रस्ता सर्व लोक वापरतात फक्त औद्योगिक क्षेत्रातील कारखानदार वापरत नाहीत. कोणीतरी टाकलेल्या अतिरोध बाबत गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र देवु” असे सांगत आपली जबाबदारी झटकून आपल्या अकलेचे तारे त्यांनी तोडले.