पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सँरेक्स कारखान्यात स्फोट झाला आहे. रासायनिक प्रक्रिया केल्या जाणाऱ्या या कारखान्यात रसायन भरलेली टाकी फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटना घडल्या नंतर कारखान्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाला देण्यात आली नव्हती. या स्फोटाचा आवाज साधारण 3 कि.मी परिसरात ऐकू आला होता.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सँरेक्स ओव्हरसिज या रासायनिक कारखान्यात शनिवारी सकाळच्या वेळी स्फोट झाला. सोशल मिडीयावर याबाबत माहिती पसरताच बोईसर एमआयडीसी पोलीसांनी घटना स्थळाला भेट दिली. प्लास्टिकच्या रिव्हिंग टॅकमध्ये नायट्रिक व व्हॅक्यूमचा दबाव वाढिल्याने हा स्फोट झाल्याचे व कोणती ही जीवतहानी वा नुकसानी झाली नसल्याबाबत पोलीसांना कारखाना व्यवस्थापनाने सांगितल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे स्फोटा नंतर घटनास्थळी पोलीस असताना देखील तुटलेले पाईप कारखान्यांच्या आवारातुन बाहेर काढण्यात आले. स्फोटाची तीव्रता इतकी भयानक असताना ही कंपनी व्यवस्थापणाने याची माहिती आपत्ती व्यवस्थापण, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस स्टेशन यांना न देताच सर्व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामुळे आता कारखान्यावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.