◾ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून निघालेला रासायनिक घातक घनकचरा विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न; भरावाच्या मातीत टाकला रासायनिक घनकचरा
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका लोखंडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रदूषणकारी उद्योजकांचा प्रदूषणाचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील रासायनिक घनकचरा व इतर प्लास्टिक विल्हेवाट लावण्यासाठी मातीच्या भरावात टाकल्याचे उघड झाले आहे. एका ट्रक मधून हा रासायनिक घनकचरा भर दिवसा टाकण्यात आला आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट नंबर जी 2 येथील विराज प्रोफाइल लिमिटेड कारखान्यातील रासायनिक घातक घनकचरा हा मातीच्या भरावात टाकण्यात आला आहे. विराज प्रोफाइल कारखान्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील साचलेला रासायनिक गाळ हा मुंबई वेस्ट मँनेजमेंटला पाठवणे बंधनकारक असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करून अशा प्रकारे बेकायदेशीर पणे रासायनिक घनकचऱ्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील नँपराँड कंपनीच्या बाजूला असलेल्या प्लाँट नंबर जी 76 येथील विराज प्रोफाइलच्या मालकीची मोकळी जागा आहे. याठिकाणी सुरूवातीला मातीचा भराव देखील करण्यात आला होता. याच जागेवर आता कारखान्यातील घनकचरा टाकला जात असल्याने अशा प्रदूषणकारी कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◾विराज प्रोफाइल कारखान्यात लोखंडावर प्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणात घातक रासायनिक सांडपाणी निघते. याअगोदर देखील मान भागातील कारखान्यातुन हे घातक रासायनिक सांडपाणी नैसर्गिक नाल्यात सोडले जात असल्याचे दिसून आले होते. मात्र त्यावेळी देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारखान्यांच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.
◾विराज प्रोफाइल कारखान्यात बेकायदेशीर पणे टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्या बाबत स्थानिक गुन्हे शाखेने मागच्या आठवड्यात कारवाई करत कारखान्या विरूद्ध गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी देखील याठिकाणी होणाऱ्या चोरट्या पाणीपुरवठा कडे दुर्लक्ष करत असल्याने कारखान्यांचे अधिक फावत आहे.