◾वाडा तालुक्यातील नेहरोली येथील घटना; रविवारी रात्री 8 वाजता आढले विहिरीतून काढले बाहेर
पालघर दर्पण: वार्ताहर
विक्रमगड: वाडा तालुक्यातील नेहरोली गावात राहणाऱ्या दोन मुलींचा घराजवळ असलेल्या पडक्या विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे. कपडे धुवायला गेले असतांना या मुली घरी आले नसताना शोधकार्य सुरू केल्यानंतर या दोन्ही मुली विहिरीत बुडलेल्या आढळून आल्या या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रविवारी सायंकाळी 5 च्या सुमारास नेहरोली गावाजवळ असलेल्या एका पडक्या विहिरीवर नैना विष्णू वाघ वय (23) व राणी राजेश जाधव वय (8) वर्षे या दोघी मुली कपडे धुवायला गेल्या होत्या. रात्री उशिरा त्या घरी न आल्याने घरातील व्यक्तींनी या मुलींची शोधाशोध सुरू केली. यावेळी विहिरीवर या मुलींनी नेलेले काही कपडे पडलेले दिसल्याने विहिरीत बुडी मारून पाहिले असता या दोन्ही मुली विहिरीत बुडल्याचे आढळले. रात्री 8 च्या सुमारास या मुलींना विहिरीतून बाहेर काढून वाडा ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.