◾ आदिवासी भागात पळस फुलांचा औषधांसाठी केला जातो वापर; सुंदर दिसणारी पळस फुले अनेक आजारांवर रामबाण औषध
पालघर दर्पण: रमेश पाटील
वाडा: वसंत ऋतुच्या आगमनाने जंगलाचे रुपडे पालटू लागले असुन झाडांवरील पानगळ गळुन नव्याने पालवी फुटू लागली आहे. त्यातच तीन पानांचा संसार थाटणा-या पळस वृक्षांवर लागलेली लालभडक रंगाची फुले सद्या निसर्ग प्रेमींचे लक्ष वेधून घेऊ लागली आहेत. लाल, केशरी, तांबड्या फुलांमुळे हिरव्यागार जंगलाच्या सौंदर्यात विशेष भर पडल्याचे दृश्य ग्रामीण भागातील जंगलात सर्वत्र पहावयास मिळत आहे.
पळसाची फुले ही विविध प्रकारच्या आजारांवर रामबाण औषध म्हणून प्रसिद्ध असल्याने ग्रामीण भागात राहणारे आदिवासी व बिगर आदिवासी ही फुले गोळा करताना जंगलामध्ये दिसत आहेत. पळसाच्या पानांच्या पत्रावळी, खोडापासून सरपण तर फुलांपासून आयुर्वेदिक औषधे असा बहुउपयोगी असलेले पळस वृक्ष हे सद्या लालभडक फुलांनी सजल्याने जंगलातील रस्त्यांवरुन जाताना मनाला भुरळ घालत आहेत. वाडा तालुक्यातील जवळपास 24 हजार हेक्टर क्षेत्र हे जंगलाने व्यापले आहे. तालुक्यातील बरेचसे जंगल हे वन्य प्राणी जीव यांच्यासाठी संरक्षीत आहे. या जंगलात विविध प्रकारची वृक्ष असुन या वृक्षांची पानगळ सुरू झाली आहे. मात्र याचवेळी लालभडक फुलांनी बहरलेले पळस वृक्ष सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
◾ पळस फुलांपासून बनवलेले औषध स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या, वारंवार होणारी पोटदुखी, पोटातील कृमी, लघवीचे आजार, रक्त शुद्धीकरण इत्यादी आजारांसाठी उपयोगात आणली जातात अशी माहिती वाडा तालुक्यातील वावेघर गावातील वनौषधी वैदु श्रीनिवास ठाकरे यांनी दिली.