तीन हायवा ट्रक ताब्यात; कारवाई शिवाय हायवा ट्रक सोडून देण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याचा पुढाकार
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वरई फाटा येथे शुक्रवारी (ता.04) रात्री बारा वाजताच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाकडून अनधिकृत रेती वाहतूक करणाऱ्या तीन हायवा ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत रेती वाहतूक प्रकरणी ट्रक मालकांकडून चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला असून महसूल विभागा कडून सुरू करण्यात आलेल्या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.
वैतरणा खाडी पात्रात जोरदार अनधिकृत रेती उत्खनन सुरू आहे. रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक वरई पारगाव रस्त्यावरून मुंबईच्या दिशेने जात असल्याची माहिती महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. रेती माफिया महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवून अनधिकृत रेती वाहतूक करीत असतात. त्यामुळे खबरदारी बाळगून शुक्रवारी रात्री महामार्गावरील वरई नाक्यावर महसूल विभागाकडून सापळा रचण्यात आला होता.
शुक्रवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास वरई पारगाव रस्त्यावरून महामार्गाकडे जाणाऱ्या तीन हायवा ट्रक महसूल विभागाच्या पथकाकडून अडवण्यात आले होते. ट्रकची पाहणी केली असता ट्रक मध्ये रेती आढळून आली. रेती वाहतूक परवान्याबाबत विचारणा करण्यात आली होती. यावेळी ट्रक चालकांकडे रेती वाहतूक परवाने नसल्याने तिन्ही ट्रक महसूल विभागाच्या पथकाकडून ताब्यात घेण्यात आले होते.
अनधिकृत रेती वाहतूक प्रकरणी ट्रक मालकांकडून चार लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कारवाई पथकात मनोरचे मंडळ अधिकारी संदीप म्हात्रे आणि तलाठी नितीन सुर्वे यांनी भाग घेतला होता.
■ तिन्ही ट्रक ताब्यात घेतल्यानंतर दंड भरण्यासाठी ट्रक मालक तयार होत नसल्याने ट्रक मनोर पोलीस ठाण्यात जमा करण्यासाठी घेऊन जात असताना हालोली गावच्या हद्दीत ट्रक [MH04KF5957] चालक रेतीने भरलेला ट्रक रस्त्याच्या कडेला टाकून पळून गेला होता.त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी एक ट्रक चालक उपलब्ध करून ट्रक मनोरच्या दिशेने घेऊन जात असताना ट्रकचे टायर फुटले. त्यामुळे कारवाई न करता हा ट्रक सोडून देण्यात आला.
■ या ट्रकचा मालक मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्त हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्याचा असल्याची माहिती पुढे येत आहे. परंतु ट्रकची नोंदणी अन्य व्यक्तीच्या नावे करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी अनधिकृत रेती वाहतुकीमध्ये गुंतल्याने कारवाईला मर्यादा येत आहेत.
■ पोलीस कर्मचाऱ्याने स्थानिक पोलिसांकरवी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षक कार्यालयात साहेबांसोबत बोलणे झाले आहे,असे सांगून कारवाई शिवाय ट्रक सोडण्याचा दबाव आणला होता.
■ दंडनीय कारवाईत सूट मिळावी आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी वरई नाक्यावर मुंबई आणि वसई तालुक्यातील रेती माफिया मोठ्या संख्येने एकत्र आले होते. दरम्यान दोन ट्रक मालकांनी चार लाखांचा दंड भरला आहे