◾ लहान बाँक्स मध्ये रासायनिक घटक टाकून वापी येथे नियमबाह्य पणे घेवून जात असताना बेटेगाव चौकीवर कारवाई
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: घातक रासायनिक घटक असलेले बाँक्स पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे बाँक्स एका मालवाहू ट्रक मधून वापी येथे पाठवले जात होते. स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बाँक्स ताब्यात घेतले असून याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल आल्यावर कारवाई करणार असल्याची भुमिका बोईसर पोलिसांनी घेतली आहे. विशेष म्हणजे या बाँक्स सोबत कोणत्याही प्रकारचे जिएसटी बिल उपलब्ध नव्हते.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक प्रदूषणाचा ठपका ठेवल्यानंतर बंद होणाऱ्या कारखान्यांना पुन्हा सुरू करण्याची परवानगी घेवून देणारा तारापूर मधील शितल पटेल या व्यक्तीने रासायनिक घटक असलेला बेकायदेशीर बाँक्स वापी येथे पाठविण्यासाठी एका भंगार व्यवसायका कडे दिला असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. शनिवारी 5 जुन रोजी सायंकाळी एका मालवाहू वाहनातून करणाऱ्या वाहन चालका कडे संशयास्पद बंद संशयास्पद बाँक्स दिल्याची माहिती पालघर दर्पण कडे खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली होती. यानंतर लागलीच याबाबत माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक आशिष पाटील व बोईसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे यांना देण्यात आली होती. यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलिसांनी बेटेगाव चौकीवर मालवाहू वाहन थांबवून संशयास्पद बाँक्स ताब्यात घेतले त्यावर 4- CHLOROANILINE 98% For Synthesis – 500 Gm अशी नोंद असून ते मानवी शरीरासाठी घातक असल्याचे समोर आले आहे.
बोईसर पोलिसांनी वाहन चालका कडे अधिक चौकशी केल्यानंतर बेकायदेशीर रासायनिक घटक पाठवणारा शितल पटेल यांने बेटेगाव चौकी येथे येवून साधारण दोन तासानंतर रासायनिक घटक असलेल्या मालाचे बिल दाखविले आहे. महत्त्वाचे म्हणजे याअगोदर देखील अशा प्रकारे नियमबाह्य पणे रासायनिक घटक असलेले पदार्थ पाठवले जात असल्याचे व मला पहिल्यांदा बाँक्स नेण्यासाठी देण्यात आल्याचे वाहन चालकांने घटनास्थळी पोलिसांना सांगितले होते. बाँक्स मध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांची तपासणी करण्यासाठी बोईसर पोलिसांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र देणार असल्याचे सांगितले असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचे पालघर दर्पण सोबत बोलताना सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेश साळुंखे यांनी सांगितले आहे.
◾ कोणत्याही रासायनिक घटकाची वाहतूक करताना त्यांच्या सोबत जिएसटी बिल असणे बंधनकारक आहे. असे असताना देखील बेकायदेशीर पणे रासायनिक घटक संशयास्पद वाहतूक करताना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी लागलीच गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना देखील बोईसर पोलिसांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत बेकायदेशीर रासायनिक घटक पाठवणारे शितल पटेल यांना विचारणा केली असता बिल पाठविण्यासाठी विसरलो असल्याचे त्यांनी सांगितले.
◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औषधाचा कच्चा माल बनविणारे कारखाने आहेत. याअगोदर झालेल्या कारवाईत ड्रग्ज साठी लागणारा कच्चा माल विशेष पथकाच्या पोलिस कारवाईत ताब्यात घेण्यात आला होता. यामुळे याठिकाणी अशा प्रकारे मालवाहू ट्रक मधून बेकायदेशीर पणे रासायनिक पदार्थांची वाहतूक केली जात असल्याचे समोर आल्याने आता औद्योगिक क्षेत्रात अधिक लक्ष देण्याचे पोलिसांन पुढे आवाहन आहे.