पालघर दर्पण, प्रतिनिधी
पालघर : जिल्ह्यात आज ४३ मिमी पाऊस झालेला असून खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात झाली आहे. तरी शेतकऱ्यांनी ८० टक्के ओलावा असणाऱ्या जमिनीमध्ये भाताच्या पेरण्या कराव्यात. भात रोपवाटिका तयार करावयाच्या क्षेत्रामध्ये जमीन नांगरून ढेकळे फोडावीत. प्रति गुंठा क्षेत्रास १०० किलो शेणखत जमिनीत मिसळावे. जमिनीचा उतार लक्षात घेऊन उंच नीचऱ्याच्या जागी तळाशी १२० से मी लांबी ते ९० से.मी. रुंदी व ८ ते १० से. मी उंचीचे उतारानुसार पेरणी योग्य लांबीचे गादीवाफे तयार करावेत. जर शेतकरी स्वतःकडे राखून ठेवलेले भात बियाणे पेरणीसाठी वापरणार असतील तर त्यांनी बियाण्यास ३ टक्के मीठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. यासाठी १० लिटर पाण्यामध्ये ३०० ग्रॅम मीठ टाकून द्रावण तयार करावे. द्रावण तयार करताना उपलब्ध भात बियाणे त्यामध्ये बुडेल असे द्रावण तयार करावे. बियाणे द्रावणात टाकल्यावर चांगले ढवळावे. चाळणीच्या सहाय्याने तरंगणारे बियाणे वेगळे करावे. जड व तळाला बसलेले बियाणे वेगळे काढून स्वच्छ पाण्याने ३ ते ४ वेळा धुवून ते ४८ तास सावलीत वाळवावे.
दिनांक १० जून २०२१ ते १२ जून २०२१ या दरम्यान पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकाडून वर्तविण्यात आली आहे. तरी भात खाचराच्या उताराच्या दिशेने पाणी जाण्यासाठी मार्ग ठेवण्यात यावा. त्यामुळे शेतातील पाणी निचरा होण्यास मदत होईल. शेतक-यांनी सावधानगिरी बाळगावी व आपल्या पशुधनाला सुरक्षित ठिकाणी हलवावे. तसेच वाळलेल्या चारा पावसात भीजू नये म्हणून सूरक्षीत ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे यांनी केली आहे.